जनसंवादातून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा

नागरिकांनी मोठया संख्येत जनसंवादात सहभाग घ्यावा -विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर

नवी मुंबई : कोकण विभागातील शहरे तसेच गावपातळीवरील जमिनी विषयक प्रलंबित प्रश्न, आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी अशा विविध विषयांसंबंधित प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जनसंवाद या उपक्रमात जनतेने मोठया संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन विभागीय महसूल आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
कोकण विभागात राबविण्यात येत असलेल्या महसूल सप्ताहाच्या 4 थ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद या उपक्रमात जिल्हा तसेच तालुका पातळीवर जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्यामार्फत महसूल अदालतींचे आयोजन करण्यात येणार असून शेती,जमिन, मालमत्ता विषयक प्रलंबित असलेली प्रकरणे/अपिले निकाली काढण्यात येणार आहेत. शेत जमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांच्या आपआपसातील वाद शेत जमिन धारकाचे क्षेत्र अदलाबदल, सलोखा योजनांतर्गत शेत बांधावरून होणारे वाद, रस्त्याचे वाद, अभिलेखातील चुकांमुळे होणारे वाद, भावाभावातील होणारे वाटणीचे वाद अशा विविध प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करण्यात येणार आहे. यासाठी तलाठी/मंडळ अधिकारी यांच्या स्तरावरून सप्ताह दरम्यान तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. अशा प्रकरणांबाबत योग्य मार्गदर्शनासाठी तलाठी कार्यालयांमार्फत शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. “आपले सरकार” या पोर्टलवर प्राप्त तक्रारींची दखल घेऊन सदर तक्रारी निकाली काढण्याबाबतची कार्यवाही करण्यात करण्यात येणार आहे. जनसंवाद उपक्रमात सहभागी होतांना नागरिकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी त्यांच्या सहकार्यासाठी ‘महसूल दूत’ उपलब्ध आहेत.
महसूल सप्ताहात कोकण विभागातील नागरिकांसाठी ‘जनसंवाद’ या उपक्रमांतर्गत उपलब्ध करुन दिलेल्या सेवा-सुविधांचा विभागातील सर्व स्तरातील नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा. असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.