न्यायालयाचा कठोर निर्णय, आरोपी ताब्यात
पीडितेच्या साक्षीवर न्यायालयाचा विश्वास
पुण्यातील एका धक्कादायक प्रकरणात सात वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात आरोपीला पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मुलगा व त्याच्या कुटुंबीयांच्या साक्षीवर न्यायालयाने विश्वास ठेवला. आरोपीचा बचाव फेटाळून लावत न्यायालयाने गंभीर निरीक्षणे नोंदवली. या निर्णयामुळे बालकांवरील गुन्ह्यांविरोधात कडक संदेश देण्यात आला आहे.
पुणे : 7 नोव्हेंबर 2022 रोजी विमानतळ पोलीस हद्दीतील एका दुकानाच्या खोलीत सात वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश (पोक्सो) एस. एस. सस्ते यांच्या न्यायालयाने गुरुवारी (24) आरोपीला दोषी ठरवत पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. 10 नोव्हेंबर 2022 रोजी अटक झाल्यानंतर तीन महिन्यांनी जामीन मिळालेल्या आरोपीला निकालानंतर तत्काळ ताब्यात घेऊन तुरुंगात पाठवण्यात आले, अशी माहिती विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी दिली.
तक्रारदार मुलगा, त्याची आई आणि वडील यांनी दिलेले पुरावे सुसंगत व विश्वासार्ह असल्याचे न्यायालयाने नमूद केले. मुलाची साक्ष आत्मविश्वासपूर्ण असून ती शिकवलेली वाटत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. हा प्रकार दुकानाच्या आतील बंद खोलीत घडल्याने स्वतंत्र साक्षीदाराची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले.
केस कापताना झालेल्या दुखापतीमुळे खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोपीचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाने नमूद केले की तक्रारदाराने कोणत्याही गंभीर दुखापतीचा उल्लेख केलेला नाही आणि ती किरकोळ बाब होती. तसेच अशा प्रकारचे आरोप करून कोणतेही कुटुंब स्वतःची प्रतिष्ठा धोक्यात घालणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने अल्पवयीन मुलांवरील अशा गुन्ह्यांचा मानसिक परिणाम गंभीर असतो, असे सांगत दृश्यमान जखमा नसल्या तरी पीडितेच्या वेदना कमी होत नाहीत, असे निरीक्षण नोंदवले. लहान वयातच पीडितेला मोठ्या यातना सहन कराव्या लागतात, असेही न्यायालयाने नमूद केले.
(लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.)










