रक्तदान व मोफत नेत्रतपासणी शिबीराचेहि आयोजन
वेंगुर्ले (प्रतिनिधी)-
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्गच्यावतीने 1 जानेवारी 2023 रोजी देवगड-सडा येथे सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ व देवगड तालुका भंडारी समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य भंडारी समाज कुटुंबाच्या जनगणनेचा मुख्य कार्यक्रमाचे अनुषंगाने भव्य रक्तदान, मोफत नेत्रतपासणी शिबीराचे व नवानिर्वाचित सरपंच व सदस्यांचा गौरव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यांत आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांनी पत्रकार परीषदेत दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने देवगड-सडा येथे रविवार 1 जानेवारी 2023 रोजी भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता देवगड-सडा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच त्याच ठिकाणी डॉ. सुनिल आठवले मेडिकल फाऊंडेशनच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर संपूर्ण कार्यक्रम प्रसिध्द उद्योगपती व दानशूर व्यक्तिमत्व बाबु सावंत यांच्या सौजन्याने होणार आहे. त्याच दिवशी त्याच ठिकाणी जिल्हा महासंघाने काढलेल्या सन 2023 च्या कॅलेंडरचे अनावरणही होणार आहे. या भंडारी समाज महासंघाने समाजातील गरजू व्यक्तींनीसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा लाभ बहुसंख्येने घ्यावा असे आवाहन रमण वायंगणकर यांनी केले आहे.
तसेच भंडारी समाजातील कुटुंबांची जनगणना कार्यक्रमाचा शुभारंभ याच ठिकाणी करण्यात येणार आहे व तालुक्यातील भंडारी समाजाचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. महासंघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्य, तालुक्याचे सर्व पदाधिकारी व सदस्य, तसेच समाजबांधव यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघातर्फे जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांनी केले आहे.