लोकांना विकासात्मक प्रशासन देण्याची जबाबदारी असलेलं महसूल विभाग

 

महसूल अधिकारी हा प्रशासनाचा कणा असून शासन व जनतेमधील महत्त्वाचा दुवा आहे. महसूल विभागाची नाळ शेती व शेतकऱ्यांशी जोडली आहे. जमिनीच्या विविध प्रकरणाशी निगडीत असलेल्या प्रश्नांचा ज्याच्याशी संबंध येतो, तो महसूल विभाग होय लोकांना विकासात्मक प्रशासन देण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. त्यामुळे सामान्य लोकांच्या महसूल विभागाकडून खूप अपेक्षा आहेत. महसूल विभागात काम करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करण्याकडे कल वाढवावा या करिता महाराष्ट्र शासन महसूल विभाग व वन विभाग यांच्यावतीने 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट यादरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने कोकण विभागाचे आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात महसूल सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. महसूल विभागामार्फत ज्या विविध सेवा सर्वसामान्या जनतेला दिल्या जातात. त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी व शासनाबद्दल व शासनाच्या कामांबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दिंगत व्हावा या उद्देशाने महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

महसूल सप्ताहअंतर्गत मंगळवारी दि.1 ऑगस्ट रोजी कोकण भवनातील सभागृहात आयोजित ‘जगणं सुंदर आहे’ या विषयावर शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे सुंदर असे व्याख्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ.कल्याणकर म्हणाले की, या सप्ताहात संपूर्ण कोकणातील सर्व सात-बारा आणि मालमत्ता हस्तांतरणांवर घरातील महिलांची नांवे नोंदणी करणार आहेत. कोकणातील आदिवासी बहूल जिल्ह्यांमध्ये कातकरी उत्थानाचे काम करण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना मिळणारी नुकसान भरपाई, महसूल अदालतीमधील प्रलंबित प्रकरणे, सलोखा योजना, जमिनी विषयक वाद, आपले सरकार या पोर्टलवर प्राप्त तक्रारींचा निपटारा, शहिदांच्या कुटूंबियांना मदत, त्यांना जमिन वाटप, महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित बाबी निकाली काढण्यात येणार आहेत.

महसूल सप्ताहाच्या माध्यमातून महसूल विभाग आणि जनतेतील निर्माण झालेली दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार असून या सप्ताहा दरम्यान होणारे काम सप्ताह संपल्यानंतरही पुढे असेच चालू राहणार असल्याची माहिती डॉ.कल्याणकर यांनी दिली. कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार विभागीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला.

सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी “युवा संवाद” उपक्रमाला नागरिकांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला गेला. मुंबई उपनगर जिल्हयातील बांद्रा पूर्व येथील चेतना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आयुक्त डॉ.कल्याणकर यांनी युवा संवादाचे महत्व सांगितले. पालघर जिल्हयातील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महसूल विभागाच्या दूत आणि तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. डहाणू महाविद्यालयात के.एल.पोंदा कनिष्ठ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. रत्नागिरी जिल्हयातील लांजा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड कॉलेज, सिंधुदूर्ग जिल्हयातील सांगुळवाडी वैभववाडी कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.सिंधुदूर्ग जिल्हयातील नागरिकांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

विभागीय आयुक्तांनी हा महसूल सप्ताह यशस्वी करण्यासाठी विभागात पुढील दिवसांत विविध उपक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत. यात 3 ऑगस्ट रोजी अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ, भूस्खलन, अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना मिळणारी नुकसान भरपाई, अशा परिस्थितीत घ्यावयाची काळजी या विषयांवर आधारीत ‘एक हात मदतीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 4 ऑगस्ट रोजी महसूल अदालीतींमधील प्रलंबित प्रकरणे, सलोखा योजना, जमिनी विषयक वाद, आपले सरकार या पोर्टलवर प्राप्त तक्रारींचा निपटारा अशा विषयांशी संबंधित ‘जनसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन. 5 ऑगस्ट रोजी सीमेवर तैनात सैनिक तसेच शहिदांच्या कुटूंबीयांना मदत, त्यांना जमीन वाटप, संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन. 6 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील जिल्हयात कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित बाबी निकाली काढण्यासाठी ‘महसूल संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहा दरम्यान केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेण्यासाठी ‘महसूल सप्ताह सांगता समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमांचे नियोजन करून याबाबतची प्रचार व प्रसिद्धी करण्याबरोबरच महसूल विभाग, भूमी अभिलेख आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्यामार्फत शासकीय योजनांची माहिती विशद करणाऱ्या लघु चित्रफिती तयार करून विविध प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात येणार आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये हेल्पडेस्क, हेल्पलाईन तयार करून मदत करण्याकरिता यंत्रणा कक्ष करण्यात येणार आहे.

कोकण विभागात हा महसूल सप्ताह यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता उपआयुक्त दर्जाच्या नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई शहर साठी उपआयुक्त (महसूल) कोकण विभाग श्री. विवेक गायकवाड, मुंबई उपनगर साठी उपआयुक्त (रोहयो) कोकण विभाग श्री अजित साखरे, ठाण्यासाठी उपआयुक्त (सामान्य प्रशासन) कोकण विभाग श्री. मनोज रानडे, पालघरसाठी उपआयुक्त (पुरवठा) कोकण विभाग श्री. लिलाधर दुफारे, रायगडसाठी उपआयुक्त (पुनर्वसन) कोकण विभाग श्रीमती रिता मैत्रेवार, रत्नागिरीसाठी उपआयुक्त (नगर पालिका) कोकण विभाग श्री. रविंद्र जाधव, सिंधुदूर्गसाठी उपआयुक्त (विकास आस्थापना) कोकण विभाग श्रीमती मिनल कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महसूल सप्ताहादरम्यान शासनाचे महत्वाचे कायदे, विकास योजना, उपक्रमांना प्रसिध्दी देण्यासाठी सखोल माहिती असलेल्या तज्ञांच्या मुलाखती तसेच व्याख्यानाचे प्रक्षेपण स्थानिक वृत्तवाहिन्यांवर करण्यात येईल. महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांबाबतची माहितीपत्रके तयार करून नागरिकांना देण्यात येणार आहेत. या महसूल सप्ताहात महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे. तेव्हा चला तर महसूल सप्ताहाचा आपण लाभ घेऊ या!

संजिवनी जाधव-पाटील

सहाय्यक संचालक (माहिती)

विभागीय माहिती कार्यालय

कोकण भवन, नवी मुंबई