धाकोरेतील पहिल्याच रक्तदान शिबीराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नेत्रतपासणी शिबिराचाही शंभरहून अधिक लोकांनी घेतला लाभ

श्री पावणादेवी सेवा ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम

सावंतवाडी | प्रतिनिधी : तालुक्यातील धाकोरे येथे श्री पावणादेवी सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान आणि नेत्रतपासणी शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, धाकोरे गावच्या इतिहासामधील हे पहिलेच रक्तदान शिबीर ठरल्याने परिसरात या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

श्री पावणादेवी सेवा ट्रस्ट, धाकोरे या सेवाभावी संस्थेने दैवी उत्सवाचे औचित्य साधून ‘ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग’ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर, तर ‘मातोश्री सेवाधाम ट्रस्ट, मुंबई’च्या सहकार्याने मोफत नेत्रतपासणी शिबीर आयोजित केले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री धन्वंतरी पूजनाने झाली.

या प्रसंगी व्यासपीठावर सरपंच सौ. रोहिणी मुळीक, पावणादेवी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष सागर मुळीक, सचिव सुनील मुळीक, खजिनदार निलेश मुळीक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळकृष्ण मुळीक सर, ‘ऑन कॉल रक्तदाते’चे सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, डॉ. केतन सोनी, सोनल घाडी, एसएसपीएम रक्तपेढीचे मनीष यादव, पत्रकार मदन मूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

*रक्तदानाची चळवळ गावागावात पोहचविणे गरजेचे – बाबली गवंडे*

यावेळी बोलताना बाबली गवंडे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले की, “ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता रात्री-अपरात्री धावून जाणाऱ्या रक्तदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचे कर्तव्य आहे. गावागावात अशी शिबिरे झाल्यामुळे स्थानिक पातळीवर रक्तगटांची माहिती उपलब्ध होते, ज्याचा उपयोग आणीबाणीच्या काळात रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी होतो.”

*२८ रक्तदात्यांनी केले रक्तदान*

या शिबिरात धाकोरे गावातील २० तरुणांसह एकूण २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात भोईचे केरवडे येथील शशिकांत मल्हार व त्यांची कन्या कु. हर्षदा, तसेच गोव्याहून खास रक्तदानासाठी आलेले दत्ताराम गाड व त्यांच्या पत्नी सौ. दिव्या गाड यांनी सहभाग घेऊन दातृत्वाचा आदर्श घालून दिला. अर्जुन मुळीक, प्रदीप पटेकर, प्रतिक भगत, ज्ञानदेव जोशी यांनीही रक्तदान केले. तसेच १०० हून अधिक नागरिकांनी आपली नेत्रतपासणी करून घेतली.

बाळकृष्ण मुळीक यांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे स्वागत करत सहभागी संस्थांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सुनील मुळीक यांनी केले, सूत्रसंचालन संजयबुवा मुळीक यांनी तर आभार प्रदर्शन दीपक मुळीक यांनी केले.

या यशस्वी आयोजनासाठी माजी सरपंच गणेश मुळीक, पोलीस पाटील श्रीराम राळकर, अशोक मुळीक, शंकर मुळीक, संकेत मुळीक यांसह गावातील अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.