सर्वोदय नगरमध्ये पहिल्या जोडणीचे नगरसेविका नीलम नाईक यांच्या हस्ते उद्घाटन
सावंतवाडी | प्रतिनिधी : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) कंपनीच्या वतीने सावंतवाडी शहरात पाईपद्वारे घरगुती गॅस पुरवठा (PNG) करण्याच्या सुविधेचा नुकताच अधिकृत शुभारंभ करण्यात आला. शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील सर्वोदय नगर येथील रहिवासी श्री. योगेश कुलकर्णी यांच्या निवासस्थानी पहिली गॅस जोडणी कार्यान्वित करून या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले.
नगरसेविका सौ. नीलम परिमल नाईक आणि गृहिणी सौ. स्मिता कुलकर्णी यांच्या हस्ते फित कापून या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. गॅस सिलिंडरच्या कटकटीतून मुक्तता देणारी आणि सुरक्षित मानली जाणारी ही सुविधा आता सावंतवाडीकरांच्या घराघरात पोहोचणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी नगरसेवक श्री. सुधीर अडीवरेकर, श्री. आनंद नेवगी आणि श्री. प्रतीक बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकप्रतिनिधींनी या सुविधेमुळे गृहिणींचा वेळ वाचणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.
*सुरक्षित आणि सुलभ पुरवठा*
MNGL कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना गॅस वापराबाबत तांत्रिक माहिती दिली. सिलिंडर संपण्याची भीती नसणे आणि थेट पाईपलाईनद्वारे २४ तास गॅस उपलब्ध होणे, हे या सुविधेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. याप्रसंगी परिसरातील नागरिक आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्या ग्राहकाच्या घरी गॅस पेटवून या सुविधेची यशस्वी चाचणी देखील यावेळी घेण्यात आली.











