अरुणा धरणग्रस्त गावठाणांना मोठा दिलासा : रस्ते विकासकामांसाठी ३ कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने पुनर्वसन गावठाणांतील रस्ते होणार निर्धोक

वैभववाडी प्रतिनिधी :
आखवणे, भोम, नागपवाडी व हेत किंजळीचा माळ येथील पुनर्वसन गावठाणांतील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी तब्बल ३ कोटी ८२ लाख ८ हजार ८१३ रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. या निर्णयामुळे अरुणा धरण प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक नागरिकांकडून याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानण्यात येत आहेत.

अरुणा धरणग्रस्तांचे मांगवली, कुसुर, उंबर्डे तसेच हेत किंजळीचा माळ आणि वेंगसर येथे पुनर्वसन गावठाणे उभारण्यात आली आहेत. सन २०१९ मध्ये या गावठाणांमध्ये धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, येथे मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न कायम होता. या पार्श्वभूमीवर आखवणे भोम संघर्ष कृती समितीने सातत्याने पाठपुरावा केला. पुनर्वसन गावठाणातील 18 नागरी सुविधा मध्ये गावठाणातील अंतर्गत रस्ते हे कच्चे खडिकर केलेले असतात. कोकणातील मुसळधार पावसामुळे ते वारंवार खराब होतात. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी समितीने केली होती.

या मागणीची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी शासनाकडून निधी मंजूर करून घेतला. यापूर्वीही त्यांनी आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाणाला स्वतंत्र महसुली गाव व ग्रामपंचायत दर्जा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

पुनर्वसन गावठाणांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे धरणग्रस्तांमध्ये समाधान व्यक्त होत असून पालकमंत्र्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.