देवगड / प्रतिनिधी
देवगड सातपायरी येथे दुचाकींची एकमेकांना समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ओंकार अनिलकुमार सारंग (२८, रा. देवगड- शिवनगर) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. जामसंडे येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला कुडाळ येथे नेण्यात आले आहे. हा अपघात रविवारी दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातप्रकरणी दुचाकीचालक गणेश रामकृष्ण लब्दे (३७, रा. साई कॉलनी, तळेबाजार) याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार सारंग हा रविवारी दुपारी आपल्या ताब्यातील दुचाकीने आकाश संजय जगताप (२४, रा. देवगड पवनचक्की) याच्यासमवेत बारशाच्या डेकोरेशनसाठी शिवनगर येथून जामसंडेच्या दिशेने जात होता. देवगड सातपायरी येथे समोरून भरधाव वेगाने आलेल्या गणेश लब्दे याच्या दुचाकीची धडक ओंकारच्या दुचाकीला बसली. यात ओंकार हा रस्त्यावर फेकला जात त्याला गंभीर दुखापत झाली. तर त्याच्यामागे बसलेल्या आकाशला किरकोळ दुखापत झाली. ओंकारला तात्काळ नजीकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्याला कुडाळ येथे नेण्यात आले. या घटनेची फिर्याद आकाश जगताप याने देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी संशयित गणेश लब्दे याच्याविरुद्ध अविचाराने व हयगयीने दुचाकी चालवून अपघात केल्याप्रकरणी व ओंकार सारंग याच्या गंभीर व किरकोळ दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २८१, १२५ अ, ब तसेच मोटर व्हेईकल अॅक्ट १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत करीत आहेत.












