अपघात घडल्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार
हॉकर्स युनियनचे अध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर यांचा इशारा
सावंतवाडी । प्रतिनिधी : मोती तलावाकाठी सुरू असलेला आठवडा बाजार गोदामालगतच्या जागेत हलविल्यानंतरही या आठवडा बाजाराबाबतचे ग्रहण मात्र काही केल्या सुटताना दिसत नाहीये. आठवडा बाजाराच्या नव्या जागेत असलेल्या झाडांच्या फांद्या तुटून पडत असल्यामुळे आठवडा बाजारादिवशी अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात घडलेल्या पावसामुळे झाडांच्या काही फांद्या तुटून पडल्याचे चित्र सद्यस्थितीत आहे.
दरम्यान याबाबत पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा जर कोणतीही घटना घडली तर त्याला पालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा हाॅकर्स संघटनेचे अध्यक्ष संदीप निंबाळकर यांनी दिला आहे.
मोती तलावाकाठी फुटपाथवर तत्कालीन नगराध्यक्ष संजू परब यांनी सुरू केलेला आठवडा बाजार वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मोती तलावा काठी आठवडा बाजार भरल्यामुळे मोती तलावाच्या सौंदर्याला बाधा पोहोचत असल्याचे सांगत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हा बाजार अन्यत्र हलविण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला होता. त्यानंतर होळीचा खुंट व अन्य जागांच्या शोधात सापडलेला आठवडा बाजार अखेर गोदामाच्या परिसरात असलेल्या जागेत हलविण्यात आला. व्यापाऱ्यांच्या तक्रारीनंतर तेथील जागा सुस्थितीत आणण्यात आली. मात्र, परिसरात असलेली जीर्ण व धोकादायक झाडे आणि शौचालयाचा प्रश्न आजही कायम आहे
दरम्यान, या समस्या लवकरच दूर करण्यात येतील असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या पुरातन झाडाच्या फांद्या तुटून पडत असल्यामुळे आठवडा बाजारा दिवशीच जर एखादी फांदी त्या ठिकाणी जमलेल्या व्यापारी किंवा ग्राहकांवर पडल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी संदीप निंबाळकर यांनी केली आहे.