ओवळी येथील नैसर्गिक डोहात अडकलेल्या रानगव्याला काढले सुरक्षितपणे बाहेर!

वन विभागाच्या बचाव पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने राबवले बचाव कार्य

चिपळूण (प्रतिनिधी):- तालुक्यातील ओवळी सुकविलवाडीच्या सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या नैसर्गिक डोहात अडकून पडलेल्या रानगव्याला वन विभागाच्या बचाव पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने या रानगव्याला सुरक्षितपणे बाहेर काढून हा रानगवा नैसर्गिक अधिवासात निघून गेल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वनविभागाच्या या कामगिरीबद्दल तेथील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

ओवळी येथील सुकविलवाडी येथील ग्रामस्थ लक्ष्मण झोरे हे २८ रोजी सायंकाळी ४ वाजता त्यांची गुरे चरण्यासाठी घेऊन गेले असता त्यावेळी त्यांना एक ४ ते ५ फूट खोल असलेल्या डोहात वन्यप्राणी रानगवा पडलेला दिसून आला. सदरची माहिती श्री. झोरे यांनी सायंकाळी ७ वाजता ओवळी गावचे पोलीस पाटील अजिंक्य शिंदे यांना दिली असता त्यांनी वनविभागाला कळवले.

या घटनेची तात्काळ वनविभागाने दखल घेत वन विभागाचे बचाव कार्य पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, घटनास्थळ वस्तीपासून दूर असल्याने सुमारे १ ते दीड तास चालावे लागले. सुकविलवाडीच्या पूर्व दिशेला सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या नैसर्गिक डोहात ४ ते ५ फूट खोल पाण्याने भरलेले होते. त्या डोहात सदरचा रानगवा अर्धा बुडालेला दिसून आला. वन विभागाच्या बचाव पथकाने रानगव्याची पाहणी करून तसेच घटनास्थळाची पाहणी केली असता सदरचे घटना स्थळ हे खूप अडचणीच्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी जेसीबी मशीन घेऊन जाणे शक्य नव्हते व सदरचा डोह हा पूर्णपणे काळ्या दगडाचा होता त्याला फोडणे ही शक्य नव्हते. वन विभागाच्या बचाव कार्य पथकाने व ग्रामस्थांनी सदर डोहात सुरक्षित अंतर ठेवून आजूबाजूची दगडे गोळा करून त्या डोहात टाकून रानगव्याला बाहेर पडण्यास सोपे होईल, असे करून डोहात दगडे टाकून टाकून त्याली उंची वाढवली असता तसा मार्ग तयार करून त्या वाटेने रानगवाला बाहेर काढण्याचे वन विभागाला अथक परिश्रमानंतर यश आले. हा रानगवा हा बाहेर आला अन तो नैसर्गिक अधिवासात पळून गेला. हा रानगवा पूर्णवाढीचा होता त्याचे अंदाजे वय ६ ते ७ वर्षे असून तो नर जातीचा होता. सदरचे बचाव कार्य हे रात्री ८ वाजल्या पासून ते वाजेपर्यंत पर्यंत सुरू राहिले.

सदरील बचाव कार्य मोहीम विभागीय वन विभाग रत्नागिरी (चिपळूण) श्रीम. गिरीजा देसाई पाटील, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) श्रीम. प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनाधिकारी चिपळूण एस. एस. खान, वनपाल एस. एस. सावंत, रामपूरचे वनरक्षक राहुल गुंठे, कोळकेवाडीचे वनरक्षक कृष्णा इरमले, वाहनचालक नंदकुमार कदम,अजय बडदे यांनी पार पाडली.

तसेच ओवळीचे पोलिस पाटील, अजिंक्य शिंदे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप शिंदे, ग्रामस्थ सचिन शिंदे, शुभम शिंदे , संतोष शिंदे , गणेश शिंदे , लक्ष्मण झोरे , जानू झोरे , शुभम झोरे ,अनिल जाधव ,लव पवार , राजू पवार , अनिल प्रकाश जाधव, समीर पवार, नंदू निकम, सुनील जाधव आदींनी वन्यप्राणी रानगव्याला बाहेर काढण्यात मोलाची मदत केली.