डॉ. बबन इंगोले यांच्या व्याख्यानाने श्रोते मंत्रमुग्ध रत्नागिरी :
पृथ्वीवरील सर्वात थंड, निर्जन आणि रहस्यमयी खंड असलेल्या अंटार्क्टिकाची सफर दि. 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी रत्नागिरी शहर जेष्ठ नागरिक संघाच्या शिवाजीनगर येथील सभागृहात रत्नागिरीकरांनी अनुभवली. ‘स्काय एन अर्थ’ (Sky n Earth) आणि ‘रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यानात, जागतिक स्तरावरील ख्यातनाम वैज्ञानिक डॉ. बबन एस. इंगोले यांनी अंटार्क्टिका मोहिमांमधील आपले अनुभव उलगडले. “जर्नी टू द कोल्डेस्ट अँड मोस्ट आयसोलेटेड कॉन्टिनेंट – अंटार्क्टिका” या विषयावर त्यांनी दिलेले मार्गदर्शन उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरली.
एनसीपीओआरचे व्हिजिटिंग सायंटिस्ट आणि सीएसआयआर-एनआयओचे माजी मुख्य वैज्ञानिक डॉ. बबन इंगोले यांनी आपल्या व्याख्यानात भारताच्या अंटार्क्टिका मोहिमांचा रंजक आढावा घेतला. १९८१ पासून भारताने या खंडावर संशोधनासाठी घेतलेल्या पुढाकाराची माहिती देताना त्यांनी ‘दक्षिण गंगोत्री’, ‘मैत्री’ आणि ‘भारती’ यांसारख्या तेथील संशोधन केंद्रांचे महत्त्व अधोरेखित केले. अंटार्क्टिका हा केवळ बर्फाचा खंड नसून, तो पृथ्वीच्या हवामान बदलाचे रहस्य उलगडणारी एक ‘नैसर्गिक प्रयोगशाळा’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंटार्क्टिकाचे कडाक्याचे थंडीचे वातावरण, तेथील समृद्ध जैवविविधता आणि भारताचे भूगर्भशास्त्रातील योगदान यांसारख्या क्लिष्ट विषयांना डॉ. इंगोले यांनी अत्यंत साध्या आणि ओघवत्या भाषेत मांडले. त्यांच्या या व्याख्यानातून उपस्थितांना केवळ माहितीच मिळाली नाही, तर एका महान वैज्ञानिकाचा जीवनप्रवास अनुभवण्याची संधी मिळाली.
’स्काय एन अर्थ हा समुहाने’ गेले सहा वर्ष रत्नागिरी मध्ये विज्ञान, पर्यावरण, खगोल, गड किल्ले या विषयावर व्याख्याने व क्षेत्र भेटींचे कार्यक्रम विषयतज्ञ व्यक्तींच्या उपस्थितीत आयोजित केले आहेत. रविवारी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांसह विज्ञानप्रेमींची मोठी उपस्थिती होती. डॉ. इंगोले यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे मार्गदर्शन लाभल्याने रसिक श्रोत्यांनी समाधान व्यक्त केले.
अशा प्रकारच्या माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल ‘स्काय एन अर्थ’ आणि ‘रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ’ यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर कार्यक्रमात डॉ. बबन इंगोले, डॉ. अरविंद कुलकर्णी, श्रीम. सरोज सावंत आणि श्री. थरवळ यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किशोर सुखटणकर यांनी आणि सूत्रसंचालन श्रीम. अजिता मलुष्टे यांनी केले.