आकस्मिक मृत्यू, अन् चौकशी : फाईल बंद…!
क्राइम फाईल….. संतोष वायंगणकर
रविवारचा दिवस कधी-कधी थोडा रिलॅक्स असतो. नेहमीची कामाची गडबड रहात नाही. तस म्हटल तर असे रविवार फार कमी वाट्याला येतात. पण आज नेहमीप्रमाणे व्हॉट्सअप ओपन केलं. प्रहार डिजीटलच्या डेक्सवर काय विशेष न्यूज म्हणून पाहिलं तर देवगड तालुक्यातील बापर्डे आणि टेंबवली गावच्या दोन महिलांचे मृतदेह सापडल्याची न्यूज डेक्सवर होती. अपघात, मृत्यू, आत्महत्या या घटना वृत्तपत्र कार्यालय किंवा डिजीटलचा आमचा डेक्स यावर काही नवीन नसतं. पण शेवटी संवेदनशील माणूस म्हणून निश्चितच अस्वस्थता वाटू लागली. बेपत्ता असलेली ५५ वर्षीय प्रतिभा दुसणकर आणि प्रतिभा प्रदिप बापर्डेकर वय ५० या दोन्ही ५० वर्ष वयाच्या महिलांचे मृतदेह वहाळात, मळईत खाडीकिनारी सापडले. या दोघींच्या मृत्यूचे कारण आज स्पष्ट होणे अवघड आणि भविष्यातही होणाऱ्या पोलिस तपासातून मृत्युस असणारे कारण उघड होईल. याबद्दल मनात शंका घेऊनच आजची क्राईम फाईल लिहितोय. असे मृत्यु झाले की आकस्मिक मृत्यु म्हणून प्राथमिक नोंद होते. अशा मृत्युंमध्ये नातेवाईकही पोलिस तपासाच्या मागे लागत नाहीत आणि पोलिसांची शोधक नजर आणि खाकीवर्दीची इच्छाशक्ती तर कधीचीच संपून गेली आहे. यातला खाकीवर्दीची इच्छाशक्ती संपून गेली आहे. हा शब्दही फार जबाबदारीने इथे वापरला आहे. अनेक आकस्मिक मृत्यु प्रकरणात दाखल असलेले मृत्यु हे संशयास्पद आहेत. अशा मृत्युप्रकरणात अनेकांना शंका येतात. काहींना त्यातली अंदर की बातही माहिती असते. परंतु अशी माहिती देणारे समाजातील कोणी पुढे येत नाहीत. पूर्वी निदान समाजातील काही नागरिक भितीपोटी पोलिसांना जाऊन थेट माहिती देत नव्हते. परंतु जर एखाद्या गावातील खुनासंदर्भात काही माहिती गावातील कुणाला असेल तर त्याची सविस्तर माहिती निनावी पत्रातून पोलिसांना कोणी तरी समाजघटकातील समाजहितचिंतक देत होता. हा निनावी पत्र लिहिणारा ना कधी समाजासमोर किंवा पोलिसांसमोर यायचा नाही. परंतु त्याच्याकडे असलेली घटनेतील सविस्तर माहिती पोलिसांना दिली जायची. यात विशेष म्हणजे पोलिसही त्या निनावी पत्रातील सूतावरून स्वर्ग गाठायचे. तपास करून आरोपींपर्यंत पोहचायचे अशी अनेक उदाहरणे आपणाला सांगता येतील. पत्र लिहायची सवयच मोडली. सोशल मिडीयाच्या जमान्यात निनावी काही लिहायला काही संधी नाही. शोधणारे त्याच्यापर्यंत सहज पोहचू शकतात. यामुळे आजच्या सोशल मिडीयावर एखाद्या मर्डर केससंबंधी कोणी काही व्यक्त झाल्याची माहिती नाही त्यामुळे आकस्मिक मृत्यु म्हणून पोलिस दप्तरी नोंद असलेल्या एखाद्या वास्तवातील मर्डरकेसचा तपास लागण सहज शक्य नाही. पूर्वी मर्डर केसचा तपास सीआयडी ब्रँचकडुन व्हायचा. सीआयडी पोलिस वाट्टेल ते करून खून प्रकरणाचा मुळाशी जाऊन तपास करायचे. तीस वर्षापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड भरणानाका येथील गोव्यातून मुंबईकडे गोवा लक्झरी बसने जाणाऱ्या चंद्रकला लोटलीकर या महिलेचा खून झाला होता. हे खून प्रकरण त्याकाळी फारच गाजले होते. एका हॉटेलमधील नोकरांनी त्या महिलेचा खून केला होता. कोणताही पुरावा तेव्हा पोलिसांना सापडत नव्हता की कोणतीही माहिती मिळत नव्हती. अखेर चंद्रकला लोटलीकर खून प्रकरणाचा तपास सीआयडी पोलिसांकडे सोपवला. एक सीआयडी विभागाचा पोलिस सहा महिने त्या हॉटेलमध्ये नोकर म्हणून राहिला. सहा महिन्यात आवश्यक असणारी माहिती गोळा केली आणि ते प्रकरण प्रत्यक्षदर्शी साक्षीदार या मुद्यावर फार टिकले नसले तरीही चंद्रकला लोटलीकर खून प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्या सीआयडी ब्रँचच्या पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेला कडक सॅल्यूट !
आज इतक्या वर्षानंतरही पोलिसांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीची आठवण होते हिच खर खाकीवर्दीच्या कामगिरीची पोचपावती आहे. अलिकडे असे कधी कुठल तपासकाम झाल्याच एेकायला मिळत नाही. समाज बदलला तशा सर्व शासकीय यंत्रणाही बदलल्या. परंतु पोलिसांनी आपली विश्वासार्हता जपली पाहिजे. अन्य कोणत्याही शासकीय विभागांपेक्षा समाजाचा खाकीवर्दीवरच भरोसा आहे. समाजातील कायदा व सुव्यवस्थास्थिती राखणे पोलिसांचे कर्तव्य आहे. सर्वच प्रकरण जर पोलिसांनी फाईलबंद केली तर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत जाईल. कोणतेही मृत्यु प्रकरण आकस्मिक मृत्यु म्हणून नोंद करून पोलिसांकडुन फाईल बंद व्हायला लागली तर माणसाला मारण ही फार सोपी गोष्ट होऊन जाईल. कोणताही पुरावा सापडणार नाही याची काळजी घेत गुन्हेगार आपलं काम फत्ते करतील. असं होऊ द्यायच नाही. पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करून वस्तुस्थिती लोकांसमोर आणली पाहिजे. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. समाज बिघडवणारी वृत्ती, प्रवृत्तीला पायबंद घालण्याचे काम पोलिसांनी केले पाहिजे. कोणत्याही प्रकरणाची फाईल बंद करण्यापेक्षा फाईल ओपन करून खाकीवर्दीने सत्य समाजासमोर आणलं पाहिजे. जेणेकरून भविष्यात कृत्य करणाऱ्यांची हिंमत होता कामा नये.












