आठवड्यातील पाच दिवस ३० ते ६० मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला
चिपळूण | प्रतिनिधी : हृदयरोगाच्या तक्रारी अलिकडे वाढतच चालल्या आहेत. तरुण वयातच हृदयरोगाचा त्रास होत असलेल्या रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे. आरोग्यदायी आहार व शिस्तबद्ध जीवनशैली या दोन चांगल्या गोष्टींमुळे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास नक्कीच मदत होईल, असे प्रतिपादन चिपळूण येथील लाईफकेअर होस्पिटलचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ. समीर दळवी यांनी केले.
हृदयरोगांला दूर ठेवून निरोगी आयुष्य मिळवण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत व त्याप्रमाणे जीवनशैलीत बदल घडवून आणले पाहिजेत. जसे कि- व्यायामाची सवय लावणे आवश्यक आहे. आठवड्यातील किमान पाच दिवस ३० ते ६० मिनिटे व्यायाम केल्याने आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होऊ शकते. आपल्या हृदयासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. ताजी फळे, भाज्या, धान्य, लीन प्रोटिन्स, हेल्दी फॅट्स यांचा आहारात समावेश करावा. लाल मांस, प्रक्रिया केलेले पदार्थ, खारट, हवाबंद डब्यातील पदार्थ इ. चे सेवन टाळावे.
आपला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयन्तशील राहणे, उच्च रक्तदाब हा हृदयरोगाचा एक जोखीम घटक आहे. जर आपण रक्तदाब नियंत्रित ठेवू शकलो तर हे आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांमधील ताण कमी करेल व त्यासाठीही सुयोग्य आहार, नियमित व्यायाम, मेडिटेशन इ. गरजेचे आहे. वजन नियंत्रणात ठेवावे, कारण जास्त वजन आपल्याला हृदयाचा ताण वाढवते. हृदयरोगासह इतरही अनेक आजारांना आमंत्रण ठरू शकते. पुरेशी झोप घ्यावी, दररोज रात्री पुरेशी म्हणजेच सहा ते आठ तास झोप घेणे गरजेचे आहे. याशिवाय घ्यावयाची काळजी म्हणजे जर कधीही तुम्हाला दम लागणे, थकवा वाटणे, पायांवर सूज येणे, छातीत अस्वस्थता वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे अशा तक्रारी जाणवल्या तर वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे. असा सल्ला डॉ. समीर दळवी यांनी दिला. ज्यांना उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास, मधुमेह, लठ्ठपणा यासारखे जोखीम घटक आहेत आणि जे धूम्रपान करत आहेत, त्यांनी त्यांच्या हृदयाची नियमित तपासणी करून घ्यावी. ज्यात विशिष्ट रक्त चाचण्या आणि ईसीजी, स्ट्रेस टेस्ट, इकोकार्डियोग्राफी, अँजिओग्राफी, हॉल्टर चाचण्या यासारख्या चाचण्यांचा समावेश आहे. वेळोवेळी हृदयविकार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असेही डॉ समीर दळवी यांनी स्पष्ट केले.
ज्या लोकांच्या कुटुंबात अनेक सदस्यांना किंवा कोणालाही हृदयविकार असेल अशा लोकांना इतरांपेक्षा हार्टअटॅक किंवा ह्रदयरोग उद्भवण्याची शक्यता/धोका जास्त असतो. तसेच जे लोक लठ्ठ आहेत, मद्यपान करतात, धुम्रपान करतात, उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत, मधुमेही आहेत त्यांना देखील हृदयविकारांचा धोका जास्त असतो. अशा व्यक्तींनीही नियमित आरोग्य तपासणी करणे व वरील सर्व सूचनांचे पालन करून आपली जीवनशैली बदलणे खूप गरजेचे आहे.












