राजापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील दोनिवडे कातळवाडी परिसरातील विविध महत्वाच्या विकासकामांचा शुभारंभ आ. किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. दोनिवडे कातळवाडी येथे कोजवे, ब्रीज आणि बसस्टॉप या विकासकामांचे भूमिपूजन तसेच नव्याने पूर्ण झालेल्या रस्त्याचा शुभारंब आ. सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना आ. किरण सामंत यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हीच आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी नमूद केले. पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन कॉजवे व ब्रीजची कामे हाती घेण्यात आली असून भविष्यात या भागातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच बसस्टॉप उभारणीमुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगत विकासकामांमध्ये कोणतीही गुणवत्ता तडजोड सहन केली जाणार नाही, अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या.
याप्रसंगी राजापूर पंचायत समिती सभापती नंदनी कदम,शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले, सरपंच सर्वेश गुरव ,जिल्हा बँकेचे संचालक महेश खामकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश सूद, उपजिल्हाप्रमुख अशफा हाजू, पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर नाना कोरगावकर, दीपक बेंद्रे, प्रल्हाद नारकर विलास हरियाण ,संतोष कुळ्ये, तानाजी पोवार, राजाराम गुरव, अंकुश गुरव, महादेव जुवळे,गुणाजी कुळ्ये, सहदेव जुवळे, रमेश तरळ, उमाजी कुळ्ये, लक्ष्मण शिरवडकर, आणि गावातील शिवसैनिक यांच्यासहित गावातील गावकर मान्यवर ग्रामस्थ पक्षाचे सर्व पदाधिकारी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.













