कुडाळमध्ये १० मे रोजी ५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषणा दिनाचे औचित्य 

कुडाळ | प्रतिनिधी : नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने आयोजित ‘५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन २०२६’ यंदा कुडाळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. रविवार, दिनांक १० मे रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५ या वेळेत ‘जय वासुदेवानंद हॉल’ (आर.एस.एन. हॉटेल शेजारी, उद्यम नगर) येथे हे भव्य संमेलन पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

तत्कालीन मंत्री नारायण राणे यांनी १० मे १९९७ रोजी ‘सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित केला होता. या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आणि सिंधुदुर्गाच्या समृद्ध निसर्गसंपदेचा जागर करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन मा. सौ. निलम नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सुयोग धस (आदर्श महाराष्ट्र भूषण सन्मानित) असतील.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते जयराजजी नायर, ॲड. मनोज आखरे (राष्ट्रीय अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड), आणि अभिमन्यू पवार उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे मंत्री नितेश राणे, गणेश नाईक, पंकजा ताई मुंडे, आमदार दिपक केसरकर, निलेश राणे, वैभव नाईक, तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिस्ये, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह कोकणातील अनेक माजी आमदार व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाची सुरुवात सकाळी ७:३० वाजता कुडाळ पोलीस स्टेशन ते संमेलन स्थळ अशा भव्य ‘वृक्षदिंडी’ने होईल. त्यानंतर:

सकाळी १०:१५: दीपप्रज्वलन व संमेलन उद्घाटन.

सकाळी १०:२०: शिवकालीन साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन.

विषय चर्चा: पर्यावरण संवर्धन, पर्यटन विकास आणि हवामान बदल यांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन.

दुपारचे सत्र: विशेष अतिथींची भाषणे, सांस्कृतिक सादरीकरणे आणि विविध क्षेत्रांतील पर्यावरणप्रेमींचा गौरव (पुरस्कार वितरण सोहळा).

या संमेलनात महाराष्ट्र व गोवा राज्यातील पर्यावरण प्रेमी, प्राणी मित्र, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. समाजात पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि शाश्वत पर्यटनाला चालना देणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील निसर्गप्रेमींनी या राष्ट्रीय स्तरावरील संमेलनाला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.