कोलगाव येथील तरुणाचा फिट आल्याने मृत्यू

कामावरून घरी परतताना काळाचा घाला

सावंतवाडी । प्रतिनिधी :कोलगाव-भोमवाडी येथील एका २९ वर्षीय तरुणाचा मोटरसायकलवरून घरी परतत असताना फिट आल्याने आणि हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. किशोर मुकुंदा मेजारी असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर मेजारी याला गेल्या काही काळापासून हृदयविकार आणि फिट येण्याचा त्रास होता. काल, सोमवार दिनांक ४ मे २०२६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास किशोर आपल्या कामावरून मोटरसायकलने घरी परतत होता. सावंतवाडी बाजारपेठ परिसरातून जात असताना अचानक त्याला फिट आली, ज्यामुळे त्याचा मोटरसायकलवरील ताबा सुटला आणि तो रस्त्याच्या कडेला कोसळला.

रुग्णालयात नेण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली

रस्त्यावर पडलेल्या किशोरला पाहून परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासले असता, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच भोम गावचे पोलीस पाटील श्री. राऊळ यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात खबर दिली. या खबरीवरून सावंतवाडी पोलिसांनी सध्या ‘अकस्मात मृत्यू’ म्हणून नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.