नसरापूर परिसर हादरला
आरोपीला तात्काळ अटक, नागरिकांत संताप
पुणे जिल्ह्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या एका अमानवी घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. एका 65 वर्षीय व्यक्तीने चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या दीड तासात आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे समाजात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नसरापूर परिसरात एका 65 वर्षीय नराधमाने चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आहे.
माहितीनुसार, ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली. मुलगी बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर काही वेळातच ही धक्कादायक घटना समोर आली.
पुणे ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या दीड तासात आरोपीला अटक केली. आरोपी हा मजुरीचे काम करणारा असून त्याच्यावर यापूर्वीही 1998 आणि 2015 मध्ये विनयभंगाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच POCSO कायद्यांतर्गतही त्याच्यावर पूर्वी कारवाई झाली होती.
या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता (BNS) अंतर्गत अत्याचार आणि हत्येचे गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत कायद्याच्या चौकटीत कारवाई होईल असे आश्वासन दिले आहे.










