चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील ओमळी गावातील युवती निलिमा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कडक शासन करावी, अशी मागणी करणारे निवेदन सोमवारी नारदखेरकी ग्रामपंचायतचे सरपंच राघो आंबावकर, सदस्य व ग्रामस्थ यांच्यामार्फत चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजमाने यांना देण्यात आले.
या निवेदनात असे नमूद केले आहे की, ओमळी गावातील कुमारी नीलिमा सुधाकर चव्हाण हिचा १ ऑगसट रोजी मृत्यू झाला. तिचा मृतदेह दाभोळ खाडीमध्ये समुद्रकिनारी आढळून आला आहे. यावरून ग्रामपंचायत नारदखेरकीचे सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांचे असे म्हणणे आहे की, सदरचा मृत्यू घातपात असण्याची दाट शक्यता आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आपल्या तालुक्यात घडली आहे. तरी नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, गुन्हेगाराला कठोर शिक्षा करून तिला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा नारदखेरकी गावातील ग्रामस्थ व महिला बंधू-भगिनी, शाळेतील विद्यार्थ्याकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर सरपंच राघो आंबावकर, सदसय व शंभरहून अधिक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.












