पर्यटन हंगाम व वाहतूक कोंडी लक्षात घेता मालवण शहारात वाहतूक नियोजनसाठी बंदोबस्त तैनात करावा !

मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांचे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस आधीक्षकांना निवेदन 

 

मालवण | प्रतिनिधी: मालवण शहरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी तसेच वाहतूक नियोजन करण्यासाठी शहरात पोलिस, होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच खासगी लक्झरी बसेसच्या शहरातील मार्गा बाबत नियोजन करण्यात यावे. या मागणीचे निवेदन मालवण नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. नगरपालिका मुख्याधिकारी प्रतीक थोरात हे ही उपस्थित होते.

 

मालवण हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, शहरातील देऊळवाडा प्रवेशद्वार, सागरी महामार्ग जंक्शन, एस.टी.स्टँड, तारकर्ली नाका, भरड नाका, बाजारपेठ, जेटी, फोवकांडा पिंपळ आणि माघी गणेश चौक यां ठिकाणासह अन्य प्रमुख ठिकाणी सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे काहीवेळा वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका पर्यटकांसह स्थानिक नागरिक आणि विशेषतः लगतच्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना बसत आहे. अनेक वेळा रुग्णवाहिकांना रस्ता मिळणेही कठीण झाले आहे.

 

त्यामुळे पर्यटन हंगाम संपेपर्यंत वरील सर्व मुख्य नाक्यांवर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी व त्यांच्या मदतीसाठी होमगार्डची तातडीने नियुक्ती करण्यात यावी.

 

मालवण शहरातून सुटणाऱ्या खाजगी लक्झरी बसेस अरुंद रस्त्यांवरून येत असल्याने मोठी कोंडी होते. या बसेसना केवळ ‘सागरी महामार्गावरूनच प्रवासी घेण्याच्या व उतरविण्याच्या सूचना आपल्या वाहतूक शाखेमार्फत देण्यात याव्यात. शहराच्या अंतर्गत अरुंद रस्त्यांवर त्यांच्या प्रवेशास बंदी घालण्यात यावी.

 

मालवण शहरातील पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाशी समन्वय साधून नियोजन करण्यात यावे. मालवण शहराची सुव्यवस्था राखण्यासाठी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आपण आपल्या स्तरावरून तात्काळ आदेश निर्गमित करावेत, असे निवेदन मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी दिले.