निदा खानला 11 मेपर्यंत पोलिस कोठडी; धर्मांतर आणि फसवणूक प्रकरणात तपास वेगात

नमाज, हिजाब आणि धर्मांतर प्रशिक्षणाचे आरोप; सरकारी वकिलांचा दावा
औषधोपचार आणि आईला भेटण्यास न्यायालयाची परवानगी

नाशिकमध्ये गाजत असलेल्या धर्मांतर आणि फसवणूक प्रकरणात आरोपी निदा खान हिला न्यायालयाने 11 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी वकिलांनी गंभीर आरोप करत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा दावा केला आहे. तपासादरम्यान नमाज, हिजाब आणि बुरखा यासंदर्भातील प्रशिक्षण दिल्याचा मुद्दाही समोर आला आहे. दुसरीकडे, निदा खानच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावत पोलिसांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणात आता आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


नाशिक : धर्मांतर आणि फसवणुकीच्या चर्चित प्रकरणातील आरोपी निदा खान हिला न्यायालयाने 11 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाने आपापली बाजू मांडली.

सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात सांगितले की, निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज 2 मे रोजी फेटाळण्यात आला होता. त्यानंतर ती फरार होती. नाशिक आणि संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तिला अटक करण्यात आली. न्यायालयाकडे सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती, मात्र न्यायालयाने तिला 11 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सरकारी पक्षाने दावा केला की, या प्रकरणातील पीडितेला धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला होता. तिला बुरखा, नमाज आणि हिजाब यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच मोबाईलमध्ये काही चिथावणीखोर रिल्स आणि सामग्री आढळल्याचा दावाही करण्यात आला. या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असल्याची शक्यता तपासली जात असल्याचेही सांगण्यात आले.

तपासादरम्यान मालेगाव आणि संभाजीनगर येथील काही लिंकही समोर आल्याचे सरकारी वकिलांनी नमूद केले. आरोपीला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेल याचे नाव समोर आले असून त्याच्याविरोधातही तपास सुरू आहे.

दरम्यान, निदा खानच्या वतीने बाजू मांडताना वकील राहुल कासलीवाल यांनी पोलिसांच्या अनेक दाव्यांवर आक्षेप घेतला. “बुरखा कुठून आणला किंवा मोबाईलमध्ये काय डाउनलोड केले, यावरून गंभीर आरोप लावणे योग्य नाही,” असे त्यांनी न्यायालयात सांगितले. मोबाईलमधील माहिती तपासली जाऊ शकते, मात्र पोलिसांनी केलेले दावे निराधार असल्याचे त्यांनी म्हटले.

निदा खानसाठी औषधोपचाराची मागणी बचाव पक्षाने केली होती. न्यायालयाने ती मान्य करत आवश्यक वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश दिले. तसेच तिच्या आईला दिवसातून दोन वेळा भेटण्याची परवानगीही न्यायालयाने दिली आहे.

या प्रकरणातील तपास वेगाने सुरू असून पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.