रत्नागिरी : प्रतिनिधी
शनिवारी पडलेल्या अवकाळी पावसाने कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर नाणिज परिसरात ठेकेदाराने ठेवलेल्या अर्धवट कामाचा फटका महामार्गाच्या दोन्ही बाजूकडे राहणार्या ग्रामस्थांना बसला. महामार्गावरील आऊटलेटची कामे न झाल्यामुळे लोकांच्या घरात, अंगणात, दुकानांमध्ये पाणी घुसून नुकसान झाल्याचे प्रकार घडले. यामुळे ग्रामस्थांनी मोठी नाराजी व्यक्त केली.

मागील दोन दिवसांपासून नाणिज पंचक्रोशीमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस कोसळला. यामुळे महामार्गावरुन आलेले पाणी थेट सर्व्हिस रोडवर पडत होते. तेथून थेट पाणी रस्त्याच्या बाजूला राहणार्या नागरिकांच्या घरात, दुकानांमध्ये, अंगणात घुसले. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूने गटारांची कामे अर्धवट ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे पावसात येणारे पाणी ग्रामस्थांच्या घरात घुसत आहे. गतवर्षीही अशीच परिस्थिती झाली होती. मात्र वर्षभरात त्यावर कोणतेच काम ठेकेदार कंपनीने केले नसल्याचा आरोप भाजपा युवाचे पदाधिकारी चिराग खटकूळ यांनी केला आहे.
मोठ्या प्रमाणात पाणी ग्रामस्थांच्या घरात, दुकानांमध्ये व अंगणात घुसल्यामुळे ग्रामस्थांना मोठी धावपळ करावी लागली. मान्सूनला आणखी पंधरा-वीस दिवस असून, ठेकेदार कंपनीने तातडीने यावर मार्ग काढावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.













