रसगुल्ला मागितल्याने संताप! ११ वर्षांच्या मुलाला पेटत्या तंदूरमध्ये फेकल्याची धक्कादायक घटना

लग्नसमारंभात आचारीचे अमानुष कृत्य
गंभीर भाजलेल्या मुलावर लखनऊमध्ये उपचार सुरू

उत्तर प्रदेशातील बस्ती येथे एका लग्नसमारंभात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. रसगुल्ला मागितल्याच्या कारणावरून एका आचारीने ११ वर्षांच्या मुलाला पेटत्या तंदूरमध्ये फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत मुलगा चेहऱ्यापासून कंबरेपर्यंत गंभीर भाजला असून त्याच्यावर लखनऊ येथे उपचार सुरू आहेत. मुलाच्या किंकाळ्यांमुळे लग्नसमारंभात एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


बस्ती : उत्तर प्रदेशातील बस्ती छावनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाह सोहळ्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका ११ वर्षांच्या मुलाने रसगुल्ला मागितल्याने संतापलेल्या आचारीने त्याला थेट पेटत्या तंदूरमध्ये फेकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेत मुलगा गंभीर भाजला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंडा जिल्ह्यातील दुर्जनपूर परिसरात राहणारा चमन हा मुलगा आपल्या आजीसोबत मलौली गोसाई येथे एका लग्नसमारंभाला गेला होता. लग्नात आनंदाचे वातावरण असताना चमन इतर मुलांसोबत खेळत होता. यावेळी त्याने तेथे ठेवलेले रसगुल्ले मागितले. याच कारणावरून आचारी संतापल्याचे सांगितले जात आहे.

आरोपानुसार, संतापलेल्या आचारीने मुलाला पकडून थेट पेटत्या तंदूरजवळ नेले आणि त्यात फेकले. या घटनेनंतर मुलाच्या जोरदार किंकाळ्या ऐकून लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. उपस्थितांनी तातडीने मुलाला बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्याच्या चेहऱ्यापासून कंबरेपर्यंत गंभीर भाजल्या होत्या.

घटनेनंतर मुलाला तातडीने उपचारासाठी अयोध्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याने लखनऊ वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचा सल्ला दिला. सध्या मुलगा मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, घटना घडल्यानंतर संबंधित आचारी घटनास्थळावरून फरार झाला. पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सर्कल ऑफिसर स्वर्णिमा सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा आगीत गंभीर भाजला असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.