सण चतुर्थी आणि निकडीच्या प्रसंगी आमची रक्कम आम्हाला त्वरित मिळावी ; केली मागणी
बी. आय. जी. सी. कडून १२ सप्टेंबरला ग्राहकांची रक्कम देण्याची ग्वाही – मुख्याधिकारी पाष्टे.
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी– सावंतवाडी अर्बन को. ऑप. बँकेच्या अनियमित कारभाराचा ठपका ठेवून, आरबीआयने व्यवहार ठप्प केल्याने ठेवीदार- पिगमीधारक-एजंट यांचे मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीत निकडीच्या प्रसंगी, बँकेच्या ग्राहकांना स्वतःचेच पैसे मिळत नसल्याने तसेच सणाचे दिवस- गणेश चतुर्थी जवळ आल्याने महत्त्वाच्या खर्चासाठी बँकेचे संचालक तसेच मुख्याधिकारी यांचे कडे मागणी करण्यासाठी ग्राहकांनी फोंडाघाट शाखेच्या मध्ये धाव घेतली. यावेळी बँकेचे मुख्याधिकारी पाष्टे, शाखाधिकारी खान,स्टाफ, पिगमी कलेक्टर इत्यादी उपस्थित होते. उपस्थित ग्राहकांनी मुख्याधिकारी पास्टे यांना आमचे पैसे कोणत्या तारखेला नक्की मिळणार ? हे लिहून द्या, अन्यथा आम्हाला आत्महत्या करावी लागेल ? असा इशारा दिला. मात्र पाष्टे यांनी डी. आय.जी. सी. यांचे तारीख १५ जून चे पत्र दाखवून तारीख १२ सप्टेंबरला पात्र व गरजू ठेवीदारांना- पिग्मीधारकांना त्यांचे पैसे परत मिळणार असल्याची ग्वाही दिली. यावरही उपस्थित ग्राहकांचे समाधान झाले नाही. कारण यापूर्वी सुद्धा दोन-तीन वेळा तारीख देऊन ही बँकेने रक्कम दिलेली नाही, या कटू अनुभव मुळे ग्राहक संतप्त होते. याबाबत ग्राहक- ठेविदार आणि व्यापारी यांचेशी बँक संचालक व अधिकारी यांनी बैठक न घेतल्याने संशय बळावला.बँकेची गत भुदरगड सारखी होणार नाही ना ? अशीच भीती व्यक्त होत आहे. यावेळी अवि सावंत, पवार रिक्षा चालक, श्रीमती सापळे वहिनी, मरये वहिनी, दीपक देसाई, आबा शिंदे ,कोदे, बापू देसाई, कोथिंबीरे, माजी संचालक अजित नाडकर्णी आणि अनेक ठेवीदार उपस्थित होते. माजी संचालक अजित नाडकर्णी यांनी ठेवीदार पिग्मी धारक ग्रामस्थ ग्राहक यांना बँकेकडून न्याय मिळत नसल्यामुळे १६ ऑगस्ट रोजी बँकेसमोर उपोषणाचा इशारा यापूर्वीच दिला आहे. फोंडा शाखेच्या कारभाराबद्दल आणि कर्ज परिसरा बाहेर वितरित केल्याबद्दल चा संताप व्यक्त होत आहे..












