हातखंबा Accident Update : अनियंत्रित ट्रक चालकाची दोन आयशर टेम्पो, एका एर्टिका कारला धडक

15 फूट खोल कोसळून विहिरीच्या कठड्यावर अडकलेल्या ट्रकच्या चालकाचा मृत्यू 

रत्नागिरी : प्रतिनिधी 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा गावाजवळील नव्या ब्रिजवर रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील ट्रकने समोरील वाहनांना जोरदार धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटून थेट १५ फूट खाली विहिरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत .

ही घटना रविवारी १९ एप्रिल रोजी पहाटे 4.45 वा.सुमारास हातखंबा ब्रीजवर घडली. ट्रक (एमएच -०६ बीडी २५५५) लोखंडी साहित्य घेऊन पालीहून रत्नागिरीकडे येत होता. पहाटे हातखंबा ब्रिजवर आल्यावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. भरधाव ट्रकने प्रथम समोरील आयशर टेम्पो (एमएच ०७ एजे ९९१३) ला मागून जोरदार धडक दिली. या धडकेने आंब्याच्या पेट्या घेऊन वेंगुर्लाहून वाशीला निघालेला टेम्पो पलटी झाला. यानंतर पलटी झालेला टेम्पो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या आयशर टेम्पोला (एमएच ०५ ईएल ०२२७) धडकला. दरम्यान, अनियंत्रित झालेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या ईरटीका कार (एमएच ४६ सीआर ९१२३) ला देखील उजव्या बाजूने धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी होती की अपघातग्रस्त ट्रक थेट ब्रिजच्या खाली सुमारे १५ फूट खोल विहिरीत कोसळला.

या भीषण अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला, त्याला बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने बचावकार्य सुरू होते. विशाल गोकुळ माने (रा. वाशी, जि. उस्मानाबाद ) असे मयत ट्रक चालकाचे नाव आहे. या अपघातात ट्रकमधील क्लीनर योगेश गौतम माळी (वय ३२, रा. धाराशिव) तसेच महामार्गावरील कामगार राजू कुमार (वय १९, रा. उत्तर प्रदेश) हेही जखमी झाले आहेत. आयशर टेम्पो चालक इकबाल याकूब खान (वय ४२, रा. झाराप, सिंधुदुर्ग) आणि ईरटीका चालक विशाल विजय पाटील (वय ३८, रा. रायगड) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना तत्काळ जगतगुरु नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात घडल्यानंतर घटनास्थळी हातखंबा महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलिस तात्काळ दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.

हातखंबा ब्रीज येथील या अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर अपघातातील वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.