जळाल्याचा वास आणि अनोखे आवाज देतात धोक्याचे संकेत
वेळीच काळजी घेतल्यास मोठे अपघात टाळता येऊ शकतात
उन्हाळ्यात वाढत्या उकाड्यापासून बचाव करण्यासाठी अनेकजण AC चा वापर करतात. मात्र, एसी वापरताना काही छोट्या चुका गंभीर अपघाताला कारणीभूत ठरू शकतात. एसीमधून विचित्र आवाज येणे, जळाल्याचा वास येणे किंवा मशीन जास्त गरम होणे ही धोक्याची लक्षणे मानली जातात. अशा संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास एसीमध्ये स्फोट होणे किंवा आग लागण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे वेळेत योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसांत घर आणि कार्यालयांमध्ये एअर कंडिशनर (AC) चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, योग्य देखभाल न केल्यास AC धोकादायक ठरू शकतो. विशेषतः मशीनमधून येणारे काही संकेत मोठ्या अपघाताची पूर्वसूचना देत असतात.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, AC मधून सतत विचित्र आवाज येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. मोटर, फॅन किंवा कॉम्प्रेसरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास असे आवाज येऊ शकतात. वेळेत दुरुस्ती न केल्यास मशीन गरम होऊन मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
तसेच, AC मधून जळाल्याचा वास येत असल्यास तो गंभीर इशारा मानला जातो. वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट, खराब इलेक्ट्रिकल पार्ट्स किंवा ओव्हरलोडमुळे असा वास येऊ शकतो. अशावेळी तातडीने AC बंद करून तज्ञांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
काही वेळा AC चा बाहेरील युनिट खूप गरम होणे, वारंवार ट्रिप होणे किंवा अचानक बंद पडणे ही देखील धोक्याची लक्षणे असू शकतात. यामुळे कॉम्प्रेसरवर अतिरिक्त ताण येऊन आग लागण्याचा धोका वाढतो.
तज्ज्ञांच्या मते, नियमित सर्व्हिसिंग, योग्य वायरिंग आणि दर्जेदार स्टॅबिलायझरचा वापर केल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात. तसेच AC सतत दीर्घकाळ चालू ठेवण्याऐवजी मध्ये थोडा ब्रेक देणेही फायदेशीर ठरते.
उन्हाळ्यात वाढत्या वापरामुळे AC वर अतिरिक्त भार येत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मशीनमध्ये कोणताही बदल जाणवल्यास तातडीने तांत्रिक सल्ला घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.










