मुलगी परत येईल म्हणून स्टॅम्प पेपरवर दिली होती हमी
अंधश्रद्धेच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक उघड
भंडारा जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगी परत आणून देण्याचे आश्वासन देत एका भोंदू महाराजाने कुटुंबाकडून एक लाख रुपये उकळल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, मुलगी परत आली नाही तर पैसे परत देऊ, अशी हमी स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यात आली होती. मात्र मुलगी परत आली नाही आणि पैसेही परत मिळाले नाहीत. अखेर या प्रकरणाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भंडाफोड करत संपूर्ण प्रकार उघडकीस आणला आहे.
भंडारा : जिल्ह्यातील पवनी तालुक्यात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पिंपळगाव निपाणी येथील हेमदास बावणे महाराज यांच्यावर फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. एका कुटुंबातील मुलगी घरातून निघून गेल्यानंतर तिला परत आणण्यासाठी कुटुंबीय विविध प्रयत्न करत होते.
दरम्यान, बावणे महाराज जादूटोणा आणि पूजा करून घरातून गेलेल्या व्यक्तींना परत आणतात, अशी माहिती संबंधित कुटुंबाला मिळाली. त्यानंतर कुटुंबीयांनी महाराजांची भेट घेतली. यावेळी महाराजांनी पूजा केल्यास मुलगी घरी परत येईल, असा दावा केला. इतकेच नव्हे तर, “मुलगी परत आली नाही तर पैसे परत दिले जातील”, अशी हमी स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यात आली होती.
या बदल्यात संबंधित कुटुंबाकडून एक लाख रुपये घेण्यात आले. मात्र पूजा करूनही मुलगी परत आली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी पैसे परत मागितले असता त्यांना टाळाटाळ करण्यात आली. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतली.
अंनिसच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत संबंधित महाराजांचा भंडाफोड केला. या प्रकरणानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडूनही या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, अशा प्रकारे अंधश्रद्धेच्या नावाखाली आणखी किती लोकांची फसवणूक करण्यात आली आहे, याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांनी अशा भोंदूगिरीपासून सावध राहावे आणि कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.











