पालकमंत्र्यांच्या विशेष निर्णयामुळे जिल्ह्यातील ९० शाळांना दिलासा

 

शिक्षण प्रसारक मंडळाकडून आभार

सावंतवाडी । प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळांसमोर उभे राहिलेले शिक्षकांच्या कमतरतेचे संकट पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे टळले आहे. इयत्ता ९ वी आणि १० वीच्या वर्गांसाठी केवळ २० विद्यार्थी संख्या असतानाही ३ शिक्षकांना मंजुरी देण्याचा ऐतिहासिक निर्णय पालकमंत्र्यांनी शासनाकडून मंजूर करून आणला आहे. या निर्णयाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीच्या वतीने पालकमंत्र्यांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत.

 

‘संच मान्यता २०२४’ च्या नवीन नियमांमुळे अनेक ग्रामीण शाळांमधील शिक्षकांची पदे धोक्यात आली होती. मात्र, पालकमंत्री नितेश राणे यांनी पाठपुरावा करून केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक वर्षाची विशेष सवलत मिळवून दिली. आता ९ वी आणि १० वी मिळून २० विद्यार्थी असले तरी ३ शिक्षकांना मान्यता मिळणार आहे.

 

जिल्ह्याने शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच आपला दबदबा राखला आहे. २०२५ मध्ये ९९.३२% निकाल लावून सिंधुदुर्ग राज्यात प्रथम आला होता. हाच दर्जा कायम ठेवण्यासाठी शिक्षकांची पदे रिक्त न ठेवण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील सुमारे ९० माध्यमिक शाळांना होणार असून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.

 

शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन पत्राद्वारे कृतज्ञता व्यक्त केली आहे. “ग्रामीण व दुर्गम भागातील शाळा शिक्षकांविना पोरक्या होण्याची भीती होती, मात्र पालकमंत्र्यांनी तत्परतेने दखल घेतल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे,” असे श्री. नागवेकर यांनी नमूद केले.