अहमदाबादमध्ये धक्कादायक घटना; चोरी करताना पकडल्याने भाच्यानेच आत्याच्या नवऱ्याची हत्या

महिलांचे कपडे चोरण्याच्या प्रकारातून उघड झाला खून

अहमदाबादमधील शिलाज परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. चोरी करताना पकडल्यामुळे भाच्यानेच आपल्या आत्याच्या नवऱ्याची हत्या केल्याचा आरोप समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. आरोपीला महिलांचे कपडे वापरण्याची सवय असल्याचेही तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून कुटुंबीयांनाही जबर धक्का बसला आहे.


प्रहार डिजिटल : अहमदाबादच्या शिलाज परिसरात घडलेल्या एका खून प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. या प्रकरणात भाच्यानेच आपल्या आत्याच्या नवऱ्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीला अटक केल्यानंतर चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी ब्रज सोनी हा घरातून पैसे आणि महिलांचे अंडरगार्मेंट्स चोरत असताना मृतक मनीषभाई यांनी त्याला रंगेहात पकडले. त्यामुळे बदनामी होईल या भीतीने आरोपीने मनीषभाई यांचा गळा आवळून खून केला.

हत्येनंतर कार घेऊन आरोपी उदयपूरला फरार

दोन दिवसांपूर्वी अवनीश हायट्स येथील फ्लॅटमध्ये मनीषभाई मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या मुलाने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर बोपल पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, आरोपी ब्रज सोनी हा बेपत्ता असल्याचे समोर आले.

फ्लॅटमधील CCTV फुटेज तपासल्यानंतर आरोपी पहाटेच्या सुमारास मृतकांची कार घेऊन जाताना दिसला. तसेच घरातून पाच लाख रुपये चोरीला गेल्याचेही समोर आले.

अहमदाबाद ग्रामीणचे एसपी प्रकाश जाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हत्येनंतर कार घेऊन उदयपूरला फरार झाला होता. पोलिसांनी विशेष पथक पाठवून त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडून रोख रक्कम तसेच चोरी केलेले महिलांचे अंडरगार्मेंट्स जप्त करण्यात आले.

तपासात आरोपीला महिलांचे कपडे वापरण्याची सवय असल्याचेही समोर आले आहे. यापूर्वीही त्याने घरातून पैसे चोरी केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. मात्र, यावेळी चोरी उघड झाल्यानंतर त्याने थेट खून केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.