बांगलादेशकडून ऐतिहासिक पराभवानंतर पाकिस्तानला ICCचा मोठा दंड; WTC गुणांमध्येही फटका

स्लो ओव्हर रेटमुळे पाकिस्तानवर ICCची कठोर कारवाई

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यातील ऐतिहासिक पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. स्लो ओव्हर रेट राखल्यामुळे ICCने पाकिस्तान संघावर मोठा आर्थिक दंड ठोठावला आहे. यासोबतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील महत्त्वाचे गुणही कापण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पाकिस्तान संघ क्रमवारीत मोठ्या प्रमाणात खाली घसरला आहे. तर दुसरीकडे बांगलादेशने ऐतिहासिक विजयाची नोंद करत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले आहे.


प्रहार डिजिटल : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाला दुहेरी फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने स्लो ओव्हर रेटमुळे पाकिस्तान संघावर मॅच फीच्या 40 टक्के दंडासह आठ गुणांची कपात केली आहे.

ICCने दिलेल्या माहितीनुसार, वेळेच्या गणनेनंतर पाकिस्तान संघ निर्धारित वेळेपेक्षा आठ षटके मागे असल्याचे आढळले. ICCच्या नियमांनुसार प्रत्येक कमी षटकासाठी खेळाडूंवर मॅच फीच्या पाच टक्के दंडाची तरतूद आहे. त्यामुळे पाकिस्तानवर एकूण 40 टक्के दंड लावण्यात आला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानची घसरण

या शिक्षेमुळे ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 मध्ये पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. आठ गुण वजा झाल्यानंतर पाकिस्तान संघ आता केवळ चार गुणांसह आठव्या स्थानावर घसरला असून त्यांच्या खाली फक्त वेस्ट इंडिजचा संघ आहे.

दरम्यान, बांगलादेशने पाकिस्तानवर 104 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. पाकिस्तानच्या घरच्या मैदानावर मिळवलेला हा बांगलादेशचा पहिलाच कसोटी विजय ठरला. अंतिम दिवशी पाकिस्तानचा फलंदाजी क्रम दबावाखाली कोसळला.

या सामन्यात वेगवान गोलंदाज नाहिद राणा याने शानदार गोलंदाजी करत पाच विकेट्स घेतल्या आणि बांगलादेशच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या पराभवानंतर पाकिस्तान संघावर जोरदार टीका होत आहे.

ICCच्या आचारसंहितेतील कलम 2.22 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या कलम 16.11.2 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद याने दोष आणि शिक्षा मान्य केल्याने औपचारिक सुनावणीची आवश्यकता भासली नाही.

या प्रकरणात पंच रिचर्ड केटलबरो, कुमार धर्मसेना, तिसरे पंच अल्लाउद्दीन पालेकर आणि चौथे पंच गाझी सोहेल यांनी आरोप नोंदवले, तर सामनाधिकारी जेफ क्रो यांनी अंतिम शिक्षा जाहीर केली.