पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव समोर आल्याने खळबळ

पिंपरी-चिंचवडमध्ये भररस्त्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. एजे फर्निचर मॉलवर अज्ञात शूटरांनी पाच ते सहा राऊंड फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. सोशल मीडियावर व्यापाऱ्याला धमकी देण्यात आल्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. या घटनेचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगशी असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे.


एजे फर्निचर मॉलवर भररस्त्यात गोळीबार

पिंपरी-चिंचवड : शहरातील एजे फर्निचर मॉलवर शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दोन अज्ञात शूटर बाईकवरून आले आणि त्यांनी मॉलच्या फलकावर तसेच इमारतीवर अंदाधुंद गोळीबार केला. रात्री सुमारे 9:20 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या वेळी आरोपींनी पाच ते सहा राऊंड फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे.

या गोळीबारात मॉलच्या काचा फुटल्या असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. घटनेनंतर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

सोशल मीडियावर धमकी; बिश्नोई गँगच्या नावाची चर्चा

या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित व्यापाऱ्याला यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेचा संबंध गँगशी आहे का, याची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

दरम्यान, गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करणारा एक ऑडिओ क्लिप देखील समोर आला आहे. या ऑडिओमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित नावांचा उल्लेख करण्यात आला असल्याची चर्चा आहे. मात्र, या ऑडिओची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू असून संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

प्रहार डिजिटलशी बोलताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज, सोशल मीडिया पोस्ट आणि ऑडिओ क्लिपची पडताळणी केली जात आहे.