भरधाव टाटा पंच कारचा भीषण अपघात; 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, अनेक जखमी

पुण्यातील खडकवासला धरण परिसरात भरधाव वेगाने धावणाऱ्या टाटा पंच कारने भीषण अपघात घडवून आणला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सहा वाहनांसह एका रिक्षाला जोरदार धडक बसली. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून 4 वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी कार चालक आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.


भरधाव कारने उडवली अनेक वाहने

पुणे : खडकवासला धरण परिसरात एक टाटा पंच कार भरधाव वेगाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने रस्त्यावरील तब्बल सहा वाहनांना तसेच एका रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार रस्त्याच्या बाजूच्या दुकानात घुसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या भीषण अपघातात अनेक नागरिक जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

उपचारादरम्यान चिमुकल्याचा मृत्यू

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 4 वर्षीय यशराज निशांत कांबळे याला तातडीने सिंहगड रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी सुमारे 6.40 वाजण्याच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर पोलिसांनी कार चालकासह त्याचा साथीदार प्रकाश तात्याराम कोठारे याला ताब्यात घेतले असून दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.