नसरापूरमधील ज्वेलर्स दुकानात महिलांकडून शिताफीने चोरी
सीसीटीव्हीत कैद झाला संपूर्ण प्रकार; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका ज्वेलरी दुकानात ग्राहक बनून आलेल्या महिलांनी अत्यंत चलाखीने सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात सुमारे 84 हजार 600 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. पाच महिला आणि एका लहान मुलाच्या मदतीने हा संपूर्ण प्रकार घडल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट झाले आहे. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात पोलिस गस्त वाढवण्याची तसेच पुन्हा पोलिस स्टेशन सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
नसरापूर : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याने सोने खरेदीदार चिंतेत आहेत. दरम्यान, सोन्याचे भाव वाढताच सोन्याच्या चोरीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे असलेल्या एका ज्वेलर्स दुकानात ग्राहक बनून आलेल्या महिलांनी तब्बल 84 हजार 600 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नसरापूर मुख्य रस्त्यावर असलेल्या पंडित ज्वेलर्स या दुकानात 13 तारखेला सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. त्या वेळी दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी होती. याचाच फायदा घेत पाच महिला आणि एक लहान मुलगा ग्राहक असल्याचा बहाणा करून दुकानात दाखल झाले. दोन महिलांनी विविध सोन्याचे दागिने पाहण्यास सुरुवात केली, तर इतर महिला दुकानातील हालचालींवर लक्ष ठेवून होत्या.
दुकानदारांनी महिलांना नाकातील नथनी आणि इतर दागिन्यांचे पाऊच दाखवले. त्याचवेळी एका महिलेने अत्यंत शिताफीने दागिन्यांचे पाऊच हातात घेतले आणि ते जवळील मुलीकडे दिले. संबंधित मुलीने काही क्षणांत ते पाऊच लहान मुलाकडे दिले. हा सर्व प्रकार इतक्या चतुराईने करण्यात आला की, दुकानातील कोणालाही याचा संशय आला नाही. काही वेळानंतर संबंधित महिला आणि लहान मुलगा कोणतीही खरेदी न करता दुकानातून बाहेर पडले.
यानंतर दुकानदारांना संशय आला. काही वेळाने दागिन्यांची मोजणी करताना नथनीचे दोन पाऊच गायब असल्याचे विनय पंडित यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संपूर्ण चोरीचा प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्हीत महिलांनी अत्यंत चलाखीने चोरी केल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. या प्रकरणात सुमारे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर नसरापूर परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही परिसरात घरफोडी आणि इतर गंभीर घटना घडल्या आहेत. पूर्वी राजगड पोलिस स्टेशन अंतर्गत नसरापूर भागात नियमित पोलिस गस्त होत होती. मात्र, पोलिस स्टेशन हलवल्यानंतर परिसरातील गस्त कमी झाली असून त्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, नसरापूरमधील व्यापारी आणि ग्रामस्थांनी पुन्हा राजगड पोलिस स्टेशन नसरापूर येथे सुरू करावे, तसेच परिसरात पोलिस गस्त वाढवून अशा टोळ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.











