धुळ्यात भोंदू बाबाचा थरारक दुहेरी खून उघड; विवाहितेसह तरुणाची हत्या, श्वान पथकामुळे गुन्हा उघडकीस

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका भोंदू बाबाने पूजा करण्याच्या बहाण्याने विवाहित महिला आणि तिच्या मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी संशयित भोंदू बाबा योगेश खैरनार याला अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा उलगडा करण्यात श्वान पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. शनी अमावस्येच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न

धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे मोठी खळबळ उडाली आहे. जयश्री काकुस्ते (वय 25) या विवाहित महिलेचा आणि अक्षय सोनवणे या तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी भोंदू बाबा योगेश खैरनार याला अटक केली असून त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

माहितीनुसार, शनी अमावस्येच्या दिवशी जयश्री आणि अक्षय हे पूजा करण्यासाठी योगेश खैरनारच्या आश्रमात गेले होते. पूजा झाल्यानंतर भोंदू बाबाने जयश्रीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र जयश्रीने विरोध करत आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे घाबरलेल्या योगेश खैरनारने तिचा गळा आवळून खून केल्याची माहिती समोर आली आहे.

नारंगी रुमालामुळे पोलिसांना मिळाला महत्त्वाचा धागा

जयश्रीच्या हत्येनंतर आरोपीने तिच्यासोबत आलेल्या अक्षय सोनवणे यालाही मारहाण करून लोखंडी रॉडने ठार केल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्ह्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने अक्षयचा मृतदेह जंगलात नेऊन दफन केला होता. यासाठी बैलगाडीचा वापर केल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी नारंगी रंगाचा रुमाल आढळून आला. या रुमालाचा वास श्वान पथकाला दिल्यानंतर श्वान थेट योगेश खैरनारच्या आश्रमात पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

तपासादरम्यान जंगल परिसरात बैलगाडीच्या चाकांचे निशाणही पोलिसांना आढळले आहेत. तसेच आरोपीने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.