मालवण | प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘इनक्रेडेबल इंडिया’ संकल्पनेतून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने डिसेंबर २०२४ मध्ये मंजूर केलेल्या देशभरातील ४० महत्त्वाकांक्षी पर्यटन प्रकल्पांपैकी सिंधुदुर्गातील ‘आर्टिफिशल रिफ आणि अंडर वॉटर म्युझियम’ प्रकल्पाचा अत्यंत महत्त्वाचा पाचवा टप्पा मंगळवारी यशस्वीरित्या पूर्ण झाला. मंगळवारी सायंकाळी ५ वाजून 30 मिनिटांनी निवृत्त आयएनएस गुलदार युद्धनौका सिंधुदुर्ग निवती रॉक्स परिसरातील समुद्रतळाशी यशस्वीरीत्या स्थापित करण्यात माझगाव शिपयार्डच्या तंत्रज्ञांना यश आले. भारतासह संपूर्ण आशिया खंडातील पहिल्याच प्रकल्पाकडे सर्वांचेच लक्ष लागले असून भारतासाठी अत्यंत अभिमास्पद असा हा क्षण ठरला आहे.
नौदलाची चार दशके सेवा करून, गुलदार आता निवृत्त युद्धनौकेच्या प्रसारणासाठी सज्ज झाली आहे.
12 जानेवारी 2024 रोजी गुलदार नौकेचा औपचारीक सेवानिवृत्ती सोहळा झाला. तीच तिची शेवटची समुद्री मोहिम ठरली, पण इथेच तिची कहाणी संपली नाही, तर एका नव्या पर्वाची सुरुवात झाली.
भारताचे दूरदृष्टी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भारतातील नव्हे तर आशिया खंडातील पहिल्या सागरी संग्रहालयासाठी ही नौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला. नौदलाकडुन फेब्रुवारी २०२५ मध्ये औपचारिक हस्तांतरण झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुरदृष्टीपुर्ण नेतृत्वाखाली व पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने नौदलाकडून नौकेचा ताबा घेवुन या हा प्रकल्प पुर्ण करण्याचे शिवधनुष्य उचललं. 18 मे 2026 रोजी Ex INS गुलदार च्या कृत्रिम प्रवाळ भिंती आणि पाणबुडी संग्रहालयाच्या प्रथम भागाचा अंतीम टप्प्या संपन्न झाला आहे.
युद्धनौकेच्या या संपूर्ण संग्रहालयाच्या प्रकल्पामध्ये एकूण पाच टप्पे येतात. त्यापैकी पहिला टप्पा म्हणजे नौदलाकडून युद्धनौकेचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे झालेले हस्तांतरण. अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने गुलदारचे नौदलाकडुन महामंडळास हस्तांतरित करण्यात आले. प्रकल्पाचा दुसरा टप्पा म्हणजे युद्धनौकेचे सिंधुदुर्गातील आगमन. इंजिन नसलेल्या या युद्धनौकेला टग बोटींच्या सहाय्याने खेचून तिला विजयदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावर आणून स्थिर करण्यात आले. यानंतर तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली. म्हणजेच युद्धनौकेच्या पोटात असलेला सर्व पर्यावरणासहित हानिकारक घटकांची स्वच्छता करण्यात आली असुन टप्प्यासाठी युद्धनौका तयार करण्यात आली. या प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यामध्ये ही नौका 20 ते 22 मीटर खोल सागरतळाशी 19/05/2026 रोजी सायंकाळी 5.30 वा. विराजमान झाली आहे. मागील 36 तासांपासुन सदरच्या युध्दनौकेस सागरतळाशी स्थापित करण्यासाठी तज्ञांचे पथक स्थानिक प्रशासन आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अथक प्रयत्न करीत होते.
या प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, आयएएस, यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. आय. एन. एस. गुलदार युध्दनौकेच्या धडाडीच्या आणि कार्यक्षमतेच्या आठवणींसह, आता ती पर्यटकांना, अभ्यासकांना आणि साहसी जलप्रेमींना भेटायला सज्ज होईल. या संग्रहालयातील दर्शनही तितकंच खास असणार आहे. स्कूबा डायव्हिंग आणि पाणबुडीच्या सहाय्याने, पर्यटक थेट सागरतळाशी जाऊन या युद्धनौकेचा अनुभव घेऊ शकतील. येथे उभं राहणार आहे प्रवाळ, समुद्री गवत, रंगीबेरंगी मासे, आणि जैवविविधतेने परिपूर्ण असे समुद्रातील एक वेगळे जग अनुभवू शकतात. हे सर्व पाहण्यासाठी स्थानिक स्कूबा डायव्हर्स पॅडी या आंतरराष्ट्रीय संस्थेचे स्कुबा डायव्हर्स मार्गदर्शक म्हणून कार्य करतील. आणि एवढंच नाही, तर तरुणांसाठी पॅडी या संस्थेशी सलग्नित “डाइव्ह मास्टर्स” चे शैक्षणिक अभ्यासक्रमही पूर्ण करता येतील.
उपक्रमाचा उद्देश जहाजाचा इतिहास जपणे, डायव्हिंग पर्यटनाला चालना देणे आणि नवीन सागरी परिसंस्था निर्माण करणे हा आहे. हा प्रकल्प केवळ पर्यटन वाढवण्यासाठी नव्हे तर सागरी जैवविविधतेचे संरक्षण, किनारी समुदायांसाठी रोजगारनिर्मिती, आणि भारतीय नौदलाच्या वारशाचे जतन करण्याच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रकारे कृत्रिम प्रवाळभित्ती निर्माण केल्यावर, एक वर्षाच्या आत ती स्वयंपूर्ण सागरी परिसंस्था बनते, जिथे मासे, प्रवाळ, स्पंज, समुद्री वनस्पती व अनेक जीवसृष्टी विकसित होते. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव मा. संजय खंदारे, आयएएस, यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प आकारास येत असुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गठणे सर म्हणाले, “ही युद्धनौका विजयदुर्ग बंदरात आणल्यानंतर, तिचे संपूर्ण स्वच्छीकरण करण्यात आले असुन आणि त्यानंतर ती नियोजित जागी नियंत्रितपणे समुद्रात विराजमान करण्यात आली आहे. पर्यटकांना प्रमाणित स्कूबा डायव्हर्ससह मार्गदर्शित सहलींमधून पाण्याखालील युद्धनौकेचा अनोखा अनुभव घेता येईल.
सेवानिवृत्त जहाजांचे पाणबुडी संग्रहालय व कृत्रिम प्रवाळभित्ती म्हणून रूपांतर केल्याने त्यांचा इतिहास पुढील अनेक शतकांसाठी जपला जातो. या प्रत्येक जहाजामागे सेवा बजावलेले नौसैनिक आणि त्यांची शौर्यगाथा जिवंत ठेवता येते.” शेकडो हात, हजारो तास, आणि एक सामूहिक स्वप्न – हे सगळं एका यंत्रण निर्माण करत आहे.
सदरच्या उपक्रमासाठी महामंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. संजय पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. जितेंद्र सोनवणे, वरीष्ठ व्यवस्थापक श्रीमती श्रीप्रा बोरा, प्रादेशिक अधिकारी श्री. दिपक माने, व्यवस्थापक (बांधकाम) श्री. दिपक हरणे यांनी सक्रीय सहभाग आणि परीश्रम घेतले आहे.
नव्या पर्यटन युगाची सुरुवात
भारतातला आणि आशिया खंडातला पहिला सागर तळाशी स्थापित होणारा पर्यटन प्रकल्प..! गुलदार ही केवळ एक युद्धनौका नव्हे, तर ती एक नव्या युगाची सुरुवात आहे. या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यटन मंत्री शंभुराज देसाई, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री नितेश राणे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.













