पुण्यात भरदिवसा कोयता हल्ला; रिक्षा चालकावर हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल, तिघांना अटक

कात्रज–नवले ब्रिज परिसरात दत्तनगर चौकात धक्कादायक घटना
रोहित पवार यांचा व्हिडिओ शेअर करत सरकारवर सवाल

पुण्यातील कात्रज चौक ते नवले ब्रिज मार्गावर दत्तनगर चौकात भरदिवसा रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आमदार रोहित पवार यांनी तो शेअर करत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या हल्ल्यात एका रिक्षा चालकाला गंभीर दुखापत झाली असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.


पुणे : शहरातील कात्रज चौक ते नवले ब्रिज या महत्त्वाच्या महामार्गावर दत्तनगर चौकात सोमवारी (18 मे 2026) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.

या ठिकाणी रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला असून ही घटना भरदिवसा आणि गर्दीच्या परिसरात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून आमदार रोहित पवार यांनी तो शेअर करत राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुरज माणिक काळे (वय 30, रा. कात्रज) या रिक्षा चालकावर धारदार कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, रिक्षा स्टँड आणि प्रवासी बसवण्याच्या वादातून हा गँगवॉरसदृश प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

या हल्ल्यात तीन आरोपी सहभागी असल्याची माहिती असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे बाळासाहेब भोसले, गणेश हरिभाऊ धारपाले आणि गणेश ऊर्फ भाव हरिभाऊ धरपाले अशी आहेत.

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.