ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या देशव्यापी बंदच्या हाकेला राजापुरात १०० टक्के प्रतिसाद बुधवारी शहरासह ग्रामीण भागातील सर्व मेडिकल दुकाने बंद

राजापूर (प्रतिनिधी): ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट (AIOCD) यांच्या देशव्यापी बंदच्या हाकेला राजापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरासह ग्रामीण भागातील सर्व मेडिकल दुकाने बंद ठेवऊन शंभर टक्के सहभाग नोंदविला. बुधवारी (दि. 20 मे 2026) तालुक्यातील बहुतांश औषध दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
ऑनलाईन औषध विक्री बंद करावी, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अव्यवहार्य डिस्काउंटला आळा घालावा तसेच बनावट औषध विक्री रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला होता. देशपातळीवर बुधवारी हा बंद पुकारण्यात आला होता.
राजापूर तालुक्यातील केमिस्ट व्यावसायिकांनी एकजूट दाखवत या आंदोलनात सहभाग घेतला. या बंदमुळे औषध विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
जिल्हा केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन रत्नागिरी तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली हा बंद यशस्वी करण्यात आला. राजापूर तालुक्यातील ६५ औषध विक्रेत्यांनी स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभागी होत आपला सहभाग नोंदविला आहे. यामुळे राजापूर शहरासह ग्रामीण भागाता रूग्णांचीही गैरसोय झाली. राजापूर, नाटे, पाचल, जैतापूर, ओणी व अन्य भागातील सर्व मेडिकल बंद ठेवण्यात आली होती.
राजापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने अध्यक्ष एजाज पन्हळेकर, सचिव प्रफुल्ल लांजेकर, खजिनदार आदील चौगुले व सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली हा बंद पुकारण्यात आला. बंदमध्ये सगळयांनी सहभाग नोंदविल्याबद्दल राजापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने सर्व मेडिकल व्यावसायिकांना धन्यवाद दिले आहेत.