व्हायरल बिलावर कपिल देव यांच्या बनावट स्वाक्षरीचाही आरोप
भारतीय संघाने ग्रोसव्हेनॉर नव्हे तर वेस्टमोरलँड हॉटेलमध्ये साजरा केला होता विजय
1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजयाशी संबंधित एक कथित हॉटेल बिल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या बिलामध्ये भारतीय संघाने लंडनमधील ग्रोसव्हेनॉर हॉटेलमध्ये जल्लोष केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र माजी क्रिकेटपटू आणि विश्वविजेता कीर्ती आझाद यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत बिल बनावट असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी या बिलावरील कपिल देव यांच्या स्वाक्षरीलाही खोटी म्हटले आहे. तसेच भारतीय संघाने प्रत्यक्षात वेस्टमोरलँड हॉटेलमध्ये रात्रभर सेलिब्रेशन केल्याचे त्यांनी सांगितले.
लंडन : सोशल मीडियावर सध्या 1983 क्रिकेट विश्वचषक विजयाशी संबंधित एक कथित हॉटेल बिल मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या बिलामध्ये भारतीय संघाने 25 जून 1983 रोजी लंडनमधील ग्रोसव्हेनॉर हॉटेलमध्ये मोठा जल्लोष केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र माजी भारतीय क्रिकेटपटू आणि विश्वविजेता कीर्ती आझाद यांनी हा दावा पूर्णपणे चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे.
व्हायरल झालेल्या या कथित बिलामध्ये मोएट शॅम्पेन, स्टीक डिनर, व्हिस्की, बिअर आणि डनहिल सिगारेट यांसारख्या महागड्या वस्तूंचा समावेश असल्याचे दाखवण्यात आले होते. या बिलाची एकूण रक्कम सुमारे 764 पौंड इतकी दाखवण्यात आली होती. यासोबतच बिल अधिक विश्वासार्ह वाटावे यासाठी त्यावर कपिल देव यांच्या स्वाक्षरीसारखी सहीदेखील दाखवण्यात आली होती.
या व्हायरल पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. अनेकांनी भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयाच्या आठवणींना उजाळा दिला होता. मात्र कीर्ती आझाद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत हे बिल पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट केले.
आझाद यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “हे बिल पूर्णपणे बनावट आहे. आम्ही लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडजवळील वेस्टमोरलँड हॉटेलमध्ये थांबलो होतो. 25 जून 1983 रोजी विजय मिळवल्यानंतर 26 जूनच्या सकाळपर्यंत आम्ही तिथेच सेलिब्रेशन केले. आम्ही ग्रोसव्हेनॉर हॉटेलमध्ये कधीच गेलो नाही. तसेच कपिल देव यांची स्वाक्षरीही बनावट आहे.”
1983 क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक मानला जातो. लॉर्ड्स मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताने दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिज संघाचा 43 धावांनी पराभव करत पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला होता. या विजयामुळे जागतिक क्रिकेटमधील भारताचे स्थान अधिक मजबूत झाले आणि भारतीय क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली.










