फरार चालक लांजात जेरबंद
बांदा : प्रतिनिधी
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृद्धाला भरधाव कंटेनरने मागून जोरात धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. नारायण रमेश सावळ (वय ६५, रा. पत्रादेवी सावळवाडी, पेडणे) असे या अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. अपघात केल्यानंतर कंटेनरसह फरार झालेल्या चालकाला मोपा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रादेवी येथील रहिवासी असलेले नारायण सावळ हे नेहमीप्रमाणे आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. दरम्यान, सकाळी ६.२० वाजण्याच्या दरम्यान मागून येणाऱ्या एका सुसाट आणि भरधाव कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, नारायण सावळ यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक गाडीसह घटनास्थळावरून सुसाट वेगात फरार झाला. घटनेची माहिती मिळताच मोपा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. राष्ट्रीय महामार्गावरील पोलिसांना सतर्क करण्यात आले. कंटेनरच्या दिशेचा माग काढत मोपा पोलिसांनी अखेर रत्नागिरीतील लांजा येथे सापळा रचला आणि फरार कंटेनरसह चालकाला शिताफीने ताब्यात घेतले.
मयत नारायण सावळ हे ‘एमपीटी’ (MPT) विभागातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या निधनाने सावळवाडी आणि पेडणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. मोपा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.













