कोकण कृषी परिसंवादातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन; घरडा फौंडेशनचा अभिनव उपक्रम

खेड (प्रतिनिधी) : घरडा कृषी संसाधन केंद्र, कृषी विभाग खेड व चिपळूण तसेच पंचायत समिती खेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ मे २०२६ रोजी शेतकरी मेळावा व कोकण कृषी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाला खेड आणि चिपळूण तालुक्यातील सुमारे २०० हून अधिक शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती लावली. आधुनिक शेती, सेंद्रिय शेती, शासकीय योजना आणि शेतीपूरक व्यवसाय याविषयी सखोल मार्गदर्शन या परिसंवादातून करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन दोन सत्रांमध्ये करण्यात आले होते. सकाळच्या सत्राची सुरुवात घरडा कृषी संसाधन केंद्रात शेतकऱ्यांची भात बियाण्यासाठी नोंदणी करून करण्यात आली. यावेळी विविध प्रकारच्या भाजीपाला बियाण्यांचे तसेच गांडूळखताचे वाटप करण्यात आले. कृषी विभाग खेड व चिपळूण यांच्या वतीने भात बीज उगवण प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. बीज प्रक्रिया कशी करावी, त्याचे फायदे काय आहेत तसेच उत्पादन वाढीसाठी त्याचा कसा उपयोग होतो याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निरसनही करण्यात आले.
जीवाणूजन्य खतांचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेता येईल, रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे कसे वळावे याविषयी कृषी अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर शेतकऱ्यांनी घरडा कृषी संसाधन केंद्रात उभारण्यात आलेल्या विविध कृषी मॉडेल्सना भेट देऊन प्रत्यक्ष माहिती घेतली.
पंचायत समिती सभापती यांनी सकाळच्या सत्राला उपस्थित राहून घरडा कृषी संसाधन केंद्राची पाहणी केली. त्यांनी घरडा फौंडेशनने उभारलेल्या विविध कृषी मॉडेल्सचे कौतुक करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
दुसरे सत्र घरडा हॉस्पिटल येथे पार पडले. या सत्रात तालुका कृषी अधिकारी मा. माळी साहेब यांनी विविध कृषी विषयक शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच कृषीविषयक मोबाईल अ‍ॅप्सचा वापर करून शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो याबाबत मार्गदर्शन केले. पंचायत समिती खेडचे मा. गावडे साहेब यांनी पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी योजनांची माहिती दिली. तर कुणाल शिंदे यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFAY) अंतर्गत मिळणारे लाभ आणि नोंदणी प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले.
परिसंवादात तीन प्रगतशील शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवांद्वारे उपस्थित शेतकऱ्यांना प्रेरणा दिली. गांडूळखत निर्मितीत यश मिळवलेल्या सौ. स्वाती साळवी, कापसाळ येथील कुक्कुटपालन व्यवसायात यशस्वी ठरलेल्या सौ. पालांडे तसेच दुग्ध व्यवसायात स्वतःचा स्वतंत्र ब्रँड निर्माण करणारे सावर्डा येथील श्री समाधान मुळ्ये यांनी शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती कशी साधता येते याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक घरडा CSR प्रमुख मा. विनायक दळवी यांनी केले. त्यांनी घरडा कृषी संसाधन केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती देत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच घरडा कृषी संसाधन केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
घरडा केमिकल्सचे कार्यकारी संचालक श्री निलेश कुलकर्णी तसेच घरडा केमिकल्स लोटेचे प्रमुख श्री रामकृष्ण कुलकर्णी यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. शेतकरी मेळावा यशस्वी करण्यासाठी घरडा केमिकल्स लोटे यांचे सहकार्य लाभले. तसेच घरडा केमिकल्सच्या गौरी विचारे आणि आकांक्षा हिरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे मनोगत जाणून घेतले.