वैद्यकीय अधीक्षकांसह अनेक पदे रिक्त; नागरिकांचे हाल
देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांचा प्रश्न कमालीचा गंभीर बनला असून, सध्या या रुग्णालयाचा कारभारच ‘व्हेंटिलेटर’वर आल्याचे चित्र आहे. रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांपासून ते थेट वाहन चालकांपर्यंतची महत्त्वाची पदे प्रदीर्घ काळापासून रिक्त असल्याने उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. “डॉक्टरच नसल्याने उपचार करायचे कुणावर?” असा संतप्त सवाल आता स्थानिक ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरुख ग्रामीण रुग्णालयासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण ३ पदे मंजूर आहेत. मात्र, सद्यस्थितीत या तीन पदांपैकी फक्त एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. मुख्य म्हणजे रुग्णालयाचा कणा असलेले वैद्यकीय अधीक्षक हे पद पूर्णपणे रिक्त आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या प्रशासकीय आणि वैद्यकीय अशा दोन्ही व्यवस्था कोलमडल्या आहेत. एकाच डॉक्टरवर संपूर्ण रुग्णालयाचा आणि बाह्यरुग्ण विभागाचा भार पडत असल्याने रुग्णांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. केवळ मुख्य डॉक्टरांचीच नाही, तर रुग्णालयातील इतर अत्यावश्यक सेवांमधील पदेही रिकामी पडली आहेत.
यामध्ये रुग्णालयात हक्काचा रुग्णवाहिका चालक नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत गंभीर रुग्णाला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवायचे झाल्यास खाजगी वाहनांचा शोध घ्यावा लागतो. तसेच कक्षसेवकाअभावी स्वच्छतेचा आणि अंतर्गत व्यवस्थेचाही बोजवारा उडाला आहे. देवरुख आणि आसपासच्या परिसरातील शेकडो गावांमधील नागरिक, शेतकरी आणि कष्टकरी जनता या शासकीय रुग्णालयावर अवलंबून आहे. खाजगी रुग्णालयांचा खर्च परवडत नसल्याने लोक आशेने येथे येतात, मात्र येथे डॉक्टर आणि कर्मचारीच नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागते किंवा नाईलाजाने खाजगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे. “शासनाने तातडीने ही पदे भरली नाहीत, तर रुग्णालयाला टाळे ठोकून तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. आरोग्य विभागाने या गंभीर बाबीची दखल घेऊन देवरुख ग्रामीण रुग्णालयात तात्काळ पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक आणि इतर रिक्त पदांवर नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.
चौकट
देवरुख ग्रामीण रुग्णालयाची सध्याची स्थिती पाहता, केवळ रुग्णालयच नाही तर शासनाची आरोग्य यंत्रणाच ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे स्पष्ट होते. ग्रामीण भागातील गोरगरीब, शेतकरी आणि कष्टकरी जनतेसाठी शासकीय रुग्णालय हाच एकमेव मोठा आधार असतो. पण जर तिथे ३ पैकी चक्क २ डॉक्टरांची पदे रिक्त असतील आणि मुख्य वैद्यकीय अधीक्षकच नसतील, तर त्या रुग्णालयाला ‘रुग्णालय’ तरी कसे म्हणायचे? शासनाने लवकरात लवकर पदे भरावीत
मनोहर गुरव
मानवाधिकार सुरक्षा व संरक्षण ऑर्गनायझेशन (दिल्ली)
रत्नागिरी जिल्हा समाज कल्याण संपर्क सचिव













