ग्रामीण रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे देवरुख येथील सर्पदंश झालेल्या वृद्धेचा मृत्यू

ग्रामस्थांच्या आरोपांनंतर सभापती व उपसभापती आक्रमक
असा प्रकार पुन्हा घडता कामा नये, दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी-सभापती शर्वरी वेल्ये
रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या महिलेला आपला जीव गमवावा लागला- उपसभापती प्रफुल्ल बाईत
देवरूख (प्रतिनिधी)

संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे येथील सर्पदंश झालेल्या एका वृद्ध महिलेला देवरूख ग्रामीण रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धडक देत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. संबंधित ऑन ड्युटी डॉक्टरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सभापती शर्वरी वेल्ये व उपसभापती प्रफुल्ल बाईत यांनी रूग्णालय प्रशासनाला झाल्या प्रकाराचा जाब विचारत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

ताम्हाणे येथील अनुसया लहू शिगवण (वय ७५) यांना २४ मे रोजी सर्पदंश झाला होता. नातेवाईकांनी त्यांना तातडीने देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, ऑन ड्युटी असलेले डॉक्टर श्री. साळुंखे हे वेळेवर उपस्थित नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. डॉक्टर उशिरा पोहोचल्याने वृद्ध महिलेला वेळेत उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर ताम्हाणे तंटामुक्ती अध्यक्ष व शिवसेना शिंदे गटाचे अमोल गायकर यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापती सौ. शर्वरी वेल्ये, उपसभापती प्रफुल्ल बाईत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, पंचायत समिती सदस्य सुहास माईन, शिवसेना शिंदे गटाचे अमोल गायकर यांच्यासह ग्रामस्थांनी रुग्णालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारला.

यावेळी सभापती सौ. शर्वरी वेल्ये यांनी ग्रामीण भागातील रुग्णांच्या जीवाशी खेळ होणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी कडक भूमिका घेतली. ग्रामीण रुग्णालयात चोवीस तास तत्पर वैद्यकीय सेवा उपलब्ध असणे आवश्यक आहे. भविष्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा पुन्हा घडू नये, असे सांगितले. तर उपसभापती प्रफुल्ल बाईत यांनी रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या महिलेला आपला जीव गमवावा लागला असल्याचे आपल्याला सांगण्यात आले असून असा हलगर्जीपणा यापुढे सहन केला जाणार नाही. संबंधित आँन ड्युटी डाँक्टरांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, असे स्पष्ट शब्दात सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.