सांगलीत पुन्हा डान्सबारवर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका, पाच ग्राहक ताब्यात

सांगलीतील मिरज परिसरात सुरू असलेल्या एका डान्सबारवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विजयनगर भागातील ‘राहील पॅलेस’ बारमध्ये महिलांकडून ग्राहकांचे मनोरंजन केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून पाच महिलांची सुटका केली असून पाच ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्वर्गीय आर.आर. पाटील यांनी राज्यात डान्सबार बंदी लागू केली होती, मात्र त्यांच्या सांगली जिल्ह्यातच पुन्हा अशा प्रकारचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे.


डान्सबारवर पहाटेपर्यंत पोलिसांची कारवाई

सांगली : राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर.आर. पाटील यांनी महाराष्ट्रात डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र आता त्यांच्या सांगली जिल्ह्यातच पुन्हा डान्सबार सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. मिरज विजयनगर परिसरातील ‘राहील पॅलेस’ या बारवर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या ठिकाणी महिलांकडून ग्राहकांचे मनोरंजन केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

पाच ग्राहक पोलिसांच्या ताब्यात

छाप्यावेळी बारमध्ये पाच महिला नृत्य करताना आढळून आल्या. महिलांकडून अश्लील अंगविक्षेप करून ग्राहकांचे मनोरंजन केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी संबंधित महिलांची सुटका केली असून बारमध्ये उपस्थित असलेल्या पाच ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून संबंधित बारचालकांविरोधातही कारवाई करण्यात येणार आहे. पहाटेपर्यंत मिरज ग्रामीण पोलिसांकडून या ठिकाणी तपास आणि पंचनामा सुरू होता.