समाधीस्थळालगत कचरा टाकणे भोवले ..

सावंतवाडीतील व्यक्तीला १० हजारांचा दंड

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
माजगाव येथील माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांच्या समाधीस्थळाशेजारील जागेत कचरा टाकणाऱ्या सावंतवाडी शहरातील एका व्यक्तीवर माजगाव ग्रामपंचायतीने मोठी दंडात्मक कारवाई केली आहे. कचरा टाकताना रंगेहात पकडण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्तीला तब्बल १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, माजगाव ग्रामपंचायत हद्दीत आणि त्यातही माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांच्या समाधीस्थळा शेजारील पवित्र जागेत सावंतवाडी शहरातील एक व्यक्ती कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले. ऐतिहासिक आणि आदरणीय व्यक्तीच्या समाधीस्थळाचा परिसर अस्वच्छ करण्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर माजगाव ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पावले उचलली. सार्वजनिक ठिकाणी आणि अशा संवेदनशील परिसरात कचरा टाकून अस्वच्छता पसरवल्याबद्दल या व्यक्तीवर तब्बल १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

​या धडक कारवाई दरम्यान माजगावचे ग्रामविकास अधिकारी आनंदराव परब, माजी उपसरपंच संजय कानसे, सचिन मोरजकर, प्रसाद सावंत, महेश सावंत, अनिकेत सावंत आणि सुशील चौगुले आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

​परिसरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर आणि कचरा टाकणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा या निमित्ताने ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या या कडक भूमिकेचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.