पुणे-मुंबई महामार्गालगत 48 तासांत 8 जणांचा मृत्यू; फुगेवाडीत भीतीचं वातावरण, पोलिसांचा तपास सुरू

फुगेवाडीत सलग मृत्यूंमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
दारूचे व्यसन, हृदयविकार आणि नैसर्गिक मृत्यू; पोलिसांकडून विविध अंगांनी चौकशी

पुणे-मुंबई महामार्गाजवळील फुगेवाडी परिसरात गेल्या 48 तासांत 8 जणांच्या मृत्यूच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला या सर्व मृत्यूंचा परस्पर संबंध असल्याची चर्चा रंगली होती, मात्र पोलिसांनी प्रत्येक घटना स्वतंत्र असल्याचे स्पष्ट केले आहे. काही जणांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने, काहींचा नैसर्गिक कारणांमुळे तर काहींचा अतिमद्यपानामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतांपैकी अनेकांना दारूचे व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


पुणे : पुणे-मुंबई महामार्गालगतच्या फुगेवाडी परिसरात अवघ्या 48 तासांत 8 जणांच्या मृत्यूच्या घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गावात शोककळा पसरली असून या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीला या सर्व मृत्यूंचा परस्पर संबंध असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर प्रत्येक मृत्यू स्वतंत्र कारणांमुळे झाल्याचे स्पष्ट केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग फुगे (57) यांचा मृत्यू हा नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर विजय राठोड आणि राजेंद्र राठोड या सख्ख्या भावांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राजू राजपूत यांचाही मृत्यू आरोग्य बिघडल्याने झाला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अकबर पठाण यांना गेल्या अनेक वर्षांपासून दारूचे व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे.

मृतांपैकी चार जणांना दारूचे व्यसन असल्याचे समोर आले असून काहींनी हातभट्टीची दारू सेवन केली असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या सर्व घटनांमध्ये थेट संबंध असल्याचे कोणतेही पुरावे अद्याप मिळाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दापोडी पोलिसांकडून या सर्व प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

पांडुरंग सदाशिव फुगे हे वयोवृद्ध होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या माहितीनुसार त्यांना कोणताही गंभीर आजार नव्हता आणि त्यांना दारूचे कोणतेही व्यसन नव्हते. त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी शांततेत अंत्यसंस्कार केले.

विजय प्रकाश राठोड हे मुव्हर्स अँड पॅकर्स कंपनीत काम करत होते. कामावर असताना अचानक त्यांना त्रास जाणवू लागला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी समजल्यानंतर त्यांचे भाऊ राजेंद्र राठोड यांनाही धक्का बसला. त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. दोघांचाही मृत्यू हृदयविकारामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

राजू राजपूत यांना अचानक त्रास जाणवल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तर अकबर पठाण हे दीर्घकाळापासून मद्यपान करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूमागे अतिमद्यपान हे कारण असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी या सर्व घटनांचा तपास सुरू ठेवला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूंचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या घटनांमुळे परिसरात नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या दोन दिवसांत इतक्या मृत्यूंच्या घटना घडल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे सांगितले आहे.

मृतांची नावे :
1) पांडुरंग फुगे
2) विजय प्रकाश राठोड
3) राजेंद्र प्रकाश राठोड
4) राजू राजपूत
5) अकबर पठाण
6) बाबा शेख
7) आनंद देसाई
8) आनंद निकाजे

उपचार सुरू असलेले नागरिक :
1) सुभाष डिकर – मेडी पॉईंट हॉस्पिटल
2) अक्षय अवसरमल – यशवंतराव हॉस्पिटल