देवगड : प्रतिनिधी
एसटीचा ७८ वा वर्धापन दिन असल्याने राज्यातील सर्व आगारांच्या परिसरात व कंपाऊंडलगत ७८ हजार झाडे लावण्याचा संकल्प राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. परिवहन मंत्र्यांनी देवगड आगाराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रवासी व नागरिकांनी विविध समस्यांचा पाढाच त्यांच्या समोर वाचला. या समस्यांचे निराकरण केल्याचा अहवाल तात्काळ सादर करा, अन्यथा निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम ना. सरनाईक यांनी विभाग नियंत्रक व अधिकाऱ्यांना दिला. यावेळी त्यांनी एसटी स्थानकाच्या स्वच्छतेबाबत तसेच इतर समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली. एसटी स्थानकांतील अस्वच्छता दूर करण्यासाठी यांत्रिक झाडूची संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी दुपारी देवगड बसस्थानकाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार राजन तेली, शिवसेना नेते संजय आग्रे, संदेश पटेल, तालुकाप्रमुख विलास साळसकर, उपसभापती अमोल तेली, विभाग नियंत्रक दीपक घोडे, पंचायत समिती सदस्या सलोनी तळवडेकर, यंत्र अभियंता पांडुरंग वाघमोडे, आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर, स्थानकप्रमुख श्रीकांत सैतवडेकर आदी अधिकारी, कर्मचारी तसेच एसटीच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वच्छतागृहाची पाहणी; नाराजी व्यक्त
ना. सरनाईक यांनी बसस्थानकातील सुलभ शौचालयाची पाहणी केली. यावेळी त्यांना स्वच्छता कर्मचारी साफसफाई करत असल्याचे दिसून आले. त्यावर “मंत्री आले म्हणून स्वच्छतेचे काम सुरू आहे का?” असे खडे बोल सुनावत त्यांनी अधिकाऱ्यांना स्वच्छतेवर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. तसेच बैठक व्यवस्था, नवीन पंखे, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि प्रवाशांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण बसस्थानकाची पाहणी करून त्यांनी बुक व पेपर स्टॉललाही भेट दिली आणि स्टॉलधारकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या
यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ना. सरनाईक यांच्यासमोर आपल्या समस्या मांडत निवेदन दिले. कर्मचाऱ्यांची कमतरता तसेच बसगाड्यांची दुरवस्था याकडेही त्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी त्यांनी एसटीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसांचा समावेश करण्यावर भर असल्याचे सांगितले. नवीन बसगाड्या उपलब्ध करून देताना इलेक्ट्रिक बसेसच देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांची नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सीएनजीबाबत समाधानकारक अनुभव नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
बसस्थानकातील हिरकणी कक्ष सुसज्ज करणे, कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे तसेच गरम आणि थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.













