ओडिशातील जगतसिंहपूर येथे जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरण (डीआरडीए) कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या गोपनीयतेला धक्का देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला शौचालयात गुप्तपणे स्पाय कॅमेरा बसवून व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचा आरोप एका ज्युनियर क्लार्कवर आहे. संबंधित कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात आरोपीने युट्युबवरून स्पाय कॅमेरा वापरण्याची माहिती घेतल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे सरकारी कार्यालयांतील महिला सुरक्षेचा आणि गोपनीयतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
महिला सहकाऱ्यावर एकतर्फी प्रेम; नकारानंतर टोकाचे पाऊल
जगतसिंहपूर : ओडिशातील जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरण (डीआरडीए) कार्यालयात महिला शौचालयात स्पाय कॅमेरा बसवून महिला कर्मचाऱ्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात ३० वर्षीय संजय आधेखा याला पोलिसांनी अटक केली आहे. तो डीआरडीए कार्यालयात ज्युनियर क्लार्क म्हणून कार्यरत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचे एका महिला सहकाऱ्यावर एकतर्फी प्रेम होते. मात्र संबंधित महिलेने त्याला प्रतिसाद न दिल्याने त्याने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
स्पाय कॅमेरा, मोबाईल आणि पेनड्राईव्ह जप्त; फॉरेन्सिक तपास सुरू
जगतसिंहपूरचे पोलीस अधीक्षक अंकित वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने युट्युबवरून स्पाय कॅमेरा वापरण्याची माहिती मिळवली होती. त्यानंतर जानेवारी ते मार्चदरम्यान त्याने महिला शौचालयात गुप्तपणे कॅमेरा बसवला. हा कॅमेरा विशिष्ट वेळी सक्रिय होत असे. आरोपी नियमितपणे त्या ठिकाणी जाऊन उपकरण तपासत असल्याचेही तपासात समोर आले आहे. दरम्यान, एके दिवशी कॅमेरा महिलेच्या निदर्शनास आल्यानंतर संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश झाला आणि कार्यालयात एकच खळबळ उडाली.
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संजय आधेखा याला अटक केली. त्याच्याकडून स्पाय कॅमेरा, मोबाईल फोन, पेनड्राईव्ह आणि सीसीटीव्ही हार्ड डिस्क जप्त करण्यात आली आहे. सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली असून त्यामध्ये किती तासांचे रेकॉर्डिंग आहे याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी होते का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेनंतर सरकारी कार्यालयांमधील महिला सुरक्षा आणि खाजगीपणाचा अधिकार याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कार्यालयीन सुरक्षाव्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्याची मागणीही होत आहे. पोलिसांचा तपास सुरू असून फॉरेन्सिक अहवालानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











