वैभव सूर्यवंशीला तातडीने टीम इंडियात संधी द्यावी का? संजय मांजरेकर यांनी मांडले स्पष्ट मत

आयपीएल 2026 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या भारतीय टी-20 संघातील निवडीची चर्चा जोर धरत आहे. अवघ्या 15 वर्षांच्या या युवा फलंदाजाने विक्रमी धावा करत क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. आयर्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी त्याला संधी देण्याची मागणी अनेक माजी क्रिकेटपटूंनी केली आहे. मात्र माजी भारतीय फलंदाज संजय मांजरेकर यांनी याबाबत संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. सूर्यवंशीच्या क्षमतेचे कौतुक करतानाच त्याच्या भविष्यासाठी घाई करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.


सूर्यवंशीच्या निवडीवर वाढली चर्चा

नवी दिल्ली : वैभव सूर्यवंशी याच्या शानदार आयपीएल 2026 मोहीमेनंतर त्याला भारतीय वरिष्ठ टी-20 संघात त्वरित संधी द्यावी का, यावर क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. बिहारमधील समस्तीपूर येथील या युवा फलंदाजाने 16 सामन्यांत 237.31 च्या स्ट्राइक रेटने 776 धावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने हंगामात 72 षटकार ठोकत ऑरेंज कॅप आणि सर्वात मौल्यवान खेळाडू (MVP) हे मानाचे पुरस्कार पटकावले.

सध्या भारत अ संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या सूर्यवंशीला या महिन्याच्या अखेरीस आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी देण्याची मागणी वाढत आहे. भारताचा संघ 26 जूनपासून आयर्लंडमध्ये दोन टी-20 सामने खेळणार आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याच्या निवडीला पाठिंबा दिला असला तरी संजय मांजरेकर यांनी घाई न करण्याचा सल्ला दिला आहे.

मांजरेकर यांचा संयमाचा सल्ला

प्रहार डिजिटलशी बोलताना मांजरेकर म्हणाले की, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्यानंतर सूर्यवंशीचा विचार होऊ शकतो. मात्र त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही आयपीएलप्रमाणेच फलंदाजी करता येते का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. विशेषतः न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकासारख्या परदेशी परिस्थितीत त्याला लगेच खेळवणे योग्य ठरणार नाही, असे त्यांचे मत आहे.

मांजरेकर यांनी टी-20 क्रिकेटमधील बदलत्या परिस्थितीकडेही लक्ष वेधले. काही महिन्यांपूर्वी ज्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होती, त्यांच्याबाबत नंतर फारसे बोलले जात नाही, असे सांगत त्यांनी संयमाची गरज अधोरेखित केली.

सूर्यवंशीच्या फलंदाजीतील अनेक गुणांचे त्यांनी कौतुक केले. त्याच्याकडे उत्कृष्ट हिटिंग क्षमता, चेंडूचा अचूक अंदाज घेण्याची कला आणि मैदानाच्या सर्व भागात फटके खेळण्याची क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच वैयक्तिक टप्प्यांपेक्षा संघाच्या गरजेला प्राधान्य देण्याची त्याची वृत्तीही विशेष असल्याचे सांगितले.

मांजरेकर म्हणाले की, सूर्यवंशी अनेक वेळा शतकाच्या उंबरठ्यावर असताना मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. यावरून त्याला वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाच्या फायद्याची अधिक काळजी असल्याचे दिसून येते. तसेच सामन्याच्या परिस्थितीनुसार फलंदाजीची गती बदलण्याची त्याची क्षमता देखील प्रभावी असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या मते, सध्या सूर्यवंशीच्या भविष्याबाबत मोठे निष्कर्ष काढण्याऐवजी त्याच्या यशस्वी प्रवासाचा आनंद घ्यायला हवा. त्याचा हा आयपीएल हंगाम खरोखरच अभूतपूर्व होता आणि कोणत्याही प्रतिस्पर्धी संघासाठी तो सर्वात धोकादायक फलंदाज ठरला, असे मांजरेकर यांनी स्पष्ट केले.