कवी बसवंत थरकार यांच्या नवी स्वप्ने या कविता संग्रहाचे प्रकाशन

गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील तळवली येथील कवी बसवंत थरकार यांच्या “नवी स्वप्ने” या दुसऱ्या कविता संग्रहाचे प्रकाशन पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री सुधाकर चव्हाण यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. प्रकाशनानंतर गुहागर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मनाली बावधनकर यांनी अतिशय सहज सुलभ व सुंदर शब्दांत पुस्तकाचा परिचय करुन दिला. गेल्या वर्षी श्री बसवंत थरकार यांच्या “नवी पहाट” या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले होते. त्या वेळी पुस्तक परिचय आपणंच केले होते आणि आज त्यांच्या दुसऱ्या पुस्तकाचा परिचय करत आहे, याचा खूप अभिमान वाटतो असे सांगितले. नवी स्वप्ने या पुस्तकात प्रबोधनात्मक अनेक गीते व कविता आहेत. तसेच सर्व विषयांना व सर्व क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या अशा अनेक कविता मला वाचावयास मिळाल्या. त्या मुळे पहिल्या पुस्तका प्रमाणे हे दुसरे पुस्तकही वाचक रसिकांना आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव मंगेश जोशी, संचालक श्री रत्नाकर आग्रे, तळवली गटविकास मंडळाचे अध्यक्ष श्री विनायक मुळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रदीप चव्हाण, उपाध्यक्ष सौ दिप्ती गिजे, पाटपन्हाळे प्रशालेचे प्राचार्य श्री एम ए थरकार, माजी मुख्याध्यापक श्री एस एन शिर्के, वरिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे चे प्राचार्य डॉ शिंदे, डॉ राजेंद्र पवार, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सुधाकर कांबळे, डॉ. फुटाणे, डॉ जालिंदर जाधव, प्रा लंकेश गजभिये, माजी मुख्याध्यापक श्री पांडुरंग सातपुते, माजी सैनिक सुनिल जाधव, आदि मान्यवर उपस्थित होते.

कवी बसवंत थरकार यांनी मनोगत व्यक्त करताना, पुस्तक प्रकाशन करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले. अक्षरदीप प्रकाशनचे प्रकाशक श्री खोत तसेच सुंदर प्रस्तावना लिहिल्या बद्दल प्रा भीमराव धुळूबुळू सर, सुंदर चित्र रेखाटत केल्याबद्दल कला शिक्षक श्री श्रीनाथ कुळे यांचे विशेष आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अमोल जड्याळ यानी केले. प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री नितीन वैद्य, श्री प्रविण केळस्कर, सहसचिव श्री मंगेश जोशी, तळवली गटविकास मंडळाचे अध्यक्ष श्री विनायक मुळे, प्राचार्य श्री एम ए थरकार, डॉ राजेंद्र पवार, इंजि. रोहित थरकार, माजी विद्यार्थी रविंद्र पवार, राकेश पवार, संतोष पवार, इत्यादींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुधाकर चव्हाण यांनी कवी बसवंत थरकार यांच्यातील साहित्यिक गुणाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक श्री संदेश देवरुखकर यांनी सुंदर पद्धतीने साकारले. शेवटी क्रीडा शिक्षक श्री भूषण बागल यांनी आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप केला.