माजगाव परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा

नाईकवाडा येथे झाड कोसळून घराचे मोठे नुकसान

सावंतवाडी । प्रतिनिधी : गुरुवारी रात्री झालेल्या वादळी अवकाळी पावसाने माजगाव परिसराला अक्षरशः झोडपून काढले. या वादळाचा मोठा तडाखा माजगाव-नाईकवाडा येथील रहिवासी धनश्री गावकर यांच्या घराला बसला असून, मध्यरात्री त्यांच्या घरावर आंब्याचे मोठे झाड कोसळल्याने छप्पराचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री अचानक सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीच्या सुमारास वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, नाईकवाडा येथील धनश्री गावकर यांच्या घराशेजारी असलेले आंब्याचे झाड मुळासकट उखडून थेट घराच्या छतावर कोसळले. झाड कोसळल्यामुळे छतावरील सिमेंटचे पत्रे आणि कौले फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घराच्या भिंतीलाही किरकोळ तडे गेले असून घरातील सामानाचेही नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सुदैवाने, झाड कोसळले त्यावेळी घरातील सदस्य सुरक्षित ठिकाणी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या नैसर्गिक आपत्तीमुळे गावकर कुटुंबियांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

माजगाव परिसरात अनेक ठिकाणी पावसाने झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या असून, वीजपुरवठाही खंडित झाला होता. या नुकसानीची दखल घेऊन संबंधित विभागाने तात्काळ पंचनामा करावा आणि बाधीत कुटुंबाला योग्य ती शासकीय मदत मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.