अखेर ‘त्या’ ठेकेदाराकडून वेंगुर्ले – बेळगांव मार्गाच्या डागडुजीचे काम सुरु

ठेकेदार कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभागाने बजावली होती नोटीस

काळ्या यादीत टाकण्याचा दिला होता इशारा

‘प्रहार डिजीटल ‘ इफेक्ट

सावंतवाडी । प्रतिनिधी :

वेंगुर्ले बेळगाव राज्यमार्गाच्या दुरावस्थेबाबत ‘प्रहार डिजीटल ‘ मधून आवाज उठवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी संबंधित ठेकेदारास नोटीस बजावत त्वरित या रस्त्याची डागडुजी करण्याच्या सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदार कंपनीने माडखोल परिसरात पडलेले खड्डे पावसाळी डांबराने ( इमल्शनने ) बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या राज्य मार्गावरील वाहनधारक तसेच स्थानिक ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पावसाळ्यानंतर उखडलेल्या या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण संबंधित ठेकेदार कंपनीकडूनच नव्याने करून घेण्यात येईल, अशी माहितीही बांधकाम विभागाने दिली आहे.

सावंतवाडी तालुक्यातील वेंगुर्ला आकेरी बेळगाव या राज्य मार्गाच्या नूतनीकरणाचे काम मे महिन्याच्या अखेरीस कोल्हापूर येथील डी आर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले होते. मात्र, सदरचे काम पूर्णपणे नादुरुस्त झाल्याने पहिल्याच पावसात डांबरीकरणाचा वरचा थर अक्षरशः वाहून गेल्यामुळे या संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. याबाबत दै. प्रहारने आवाज उठविल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारास नोटीस बजावली होती. त्यात त्या रस्त्याची सद्यस्थितीत तात्पुरती डागडुजी करण्यात यावी तसेच पावसाळ्यानंतर डांबरीकरणाचा उखडलेला संपूर्ण थर पुन्हा करून देण्यात यावा असे नोटीस मध्ये स्पष्ट करण्यात आले होते. तसेच संबंधित ठेकेदारास या विभागात भविष्यात कोणतेही काम देणार नसल्याचेही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्व गोड यांनी स्पष्ट केले होते.

या पार्श्वभूमीवर त्याची गंभीर दखल घेत संबंधित ठेकेदार कंपनीने पावसाळी डांबराच्या सहाय्याने या भागात पडलेले खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच रस्त्यावर आलेली खडी बाजूला करून रस्ता पूर्णपणे वाहतुकीस सुरळीत करण्याचे काम देखील सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी सदर रस्ता वाहतुकीस योग्य होणार असल्याने स्थानिक ग्रामस्थांमधून तसेच वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

उपोषणाचा मार्ग स्वीकारू नये : बांधकाम विभागाचे आवाहन

वेंगुर्ले बेळगाव राज्य मार्गावरील माडखोल धवडकी व अन्य भागात नूतनीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे तसेच डांबरीकरणाचा भाग उखडून गेल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत होते. तसेच वाहनधारकांना अक्षरशः कसरत करीत गाडी चालवावी लागत होती. त्यामुळे माडखोलसह स्थानिक भागातील ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा दिला होता. आता या ठेकेदार कंपनीने रस्त्याची डागडुजी सुरू केल्यामुळे तसेच पावसाळ्यानंतर डांबरीकरणाचा वरील पूर्ण थर नव्याने करून घेतला जाणार असल्यामुळे स्थानिकांनी उपोषण किंवा आंदोलनाचा मार्ग पत्करू नये, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे

Sindhudurg